चेंबूरमध्ये तुटक्या पादचारी पुलावरून रहिवाशांचा प्रवास

मुंबई : चेंबूरच्या अण्णा भाऊ साठे नगर परिसरात असलेल्या चरई नाल्यावरील पादचारी पुल गेल्या दोन महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. मात्र पुलाची दुरूस्ती रखडल्याने शाळकरी मुलांसह येथील रहिवाशांना जीव मुठीत धरुन हा पुल पार करावा लागत आहे. त्यामुळे एखादा अपघात झाल्यावरच पालिकेला जाग येईल का असा संतप्त सवाल येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

लाखो रहिवाशांची लोकवस्ती असलेल्या चेंबूरच्या या साठे नगर आणि कोकण नगर परिसरातील रहिवाशांसाठी हा एकमेव पुल या परिसरात आहे. आरसी मार्गावरुन साठे नगर, कोकण नगर, सिंधी सोसायटी आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयात जाण्यासाठी अनेक विद्यार्थी देखील या पुलाचा वापर करतात. १२ ते १५ वर्षांपूर्वी पालिकेने जीर्ण झालेला चरई नाल्यावरील हा पूल तोडून त्या ठिकाणी नवा बांधला. मात्र गेल्या १० ते १२ वर्षांत एकदाही या पुलाची पालिकेकडून डागडुजी करण्यात न आल्याने दोन महिन्यांपूर्वी अचानक हा पुल कोसळला. यावेळी एक तरुणदेखील या घटनेत जखमी झाला होता.

सध्या या पुलाचा एकच व्यक्ती एकावेळी जाईल, इतका भाग शिल्लक आहे. त्यामुळे खाली खोल नाला असताना देखील अनेक रहिवाशी आणि विद्यार्थी मुख्य रस्त्यावर जाण्याकरिता वेळेची बचत व्हावी म्हणून या पुलाचा मार्ग अनुसरत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता असल्याने येथील रहिवाशांनी ही बाब अनेकदा पालिकेच्या एम पष्टिद्धr(१५५)म कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे. तसेच याच परिसरात राहणाऱ्या स्थानिक नगरसेवकाकडे देखील अनेकदा रहिवाशांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र पालिकेने याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

अपघात झाल्यावरच जाग येणार का?

अपघात झाल्यावरच पालिका अधिकारयांना जाग येईल का असा संतप्त सवाल रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान पुलाचा प्रस्ताव पालिकेकडे पाठवण्यात आला असून तो मंजूरदेखील झाला आहे. त्यामुळे लवकरच काम याठिकाणी सुरू होईल असे स्थानिक नगरसेवक महादेव शिगवण यांनी सांगितले.