गर्दुल्यांचा विळखा, रोषणाई त्रासदायक; स्कायवॉक हटविण्यासाठी नागरिक संघटित
ग्रँटरोड येथील नाना चौकात असणारा स्कायवॉक हटवण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. या स्कायवॉकचा वापर रात्री गर्दुल्ले, दारू पिणारे करत असून स्वच्छता न झाल्याने येथील कचऱ्याचा नागरिकांना त्रास होत आहे. तसेच नाना चौकात गोलाकार फिरलेल्या या स्कायवॉकवर करण्यात आलेल्या बहुरंगी रोषणाईचाही जास्त त्रास होत असल्याने हा स्कायवॉक हटवण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक एकत्र आले आहेत.
नाना चौकात ग्रँटरोड रेल्वे स्थानकापासून आलेला स्कायवॉक येथील स्थानिक नागरिकांसाठी एक दु:स्वप्न बनून समोर आलेला आहे. स्थानकातून चौकात आलेला स्कायवॉक नागरिकांना वापरण्यायोग्य असला तरी ऐन चौकात स्कायवॉक संपूर्ण गोलाकारात फिरवला असून याला स्थानिकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या गोलाकार स्कायवॉकवर बहुरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली असल्याने आजूबाजूच्या इमारतीमधील नागरिकांना त्यांच्या खिडक्या उघडणेही मुश्कील झाल्याने अनेकांना खिडक्या बंदच ठेवाव्या लागतात. त्यामुळे स्कायवॉकच्या विरोधात येथील ईश्वरदास इमारत, महापालिकेची नवी इमारत, नेस बाग इमारत यात राहणाऱ्या रहिवाशांनी एकजूट केली आहे. हा स्कायवॉक स्थानिकांच्या उपयोगाचा नसून तो हटवण्यात यावा अशी या नागरिकांची मागणी आहे. येथील अस्वच्छतेचा मोठा त्रास होत असून स्कायवॉकवर रात्री होणारी दारू पिणारे व गर्दुल्ल्यांची गर्दी यामुळे तरुणी व महिलांना येथून जाताना अडचण होत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. या रहिवाशांनी या स्कायवॉकबाबत स्थानिक खासदार अरविंद सावंत यांना पत्र लिहून आपल्या तक्रारी कथन केल्या असून यात त्यांनी स्कायवॉकचा रात्री होणार दुरुपयोग व येथील सरकते जिने बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास याचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे.
दरम्यान, हा स्कायवॉक हटवण्याच्या नागरिकांच्या मताशी स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे जवळपास ४३ कोटींचा खर्च करून बांधण्यात आलेला हा स्कायवॉक जर हटवावा लागणार असेल तर नागरिकांची गरज नसताना हा स्कायवॉक बांधण्यात का आला, असा प्रश्न काहींनी आता उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक आमदारही नागरिकांशी सहमत
स्कायवॉकचा नागरिकांना कोणताही उपयोग नसून उलट चौकाचे सौंदर्य या स्कायवॉकमुळे नाहीसे झाले आहे. तसेच या स्कायवॉकचा वापर होण्याऐवजी गैरवापर जास्त असून या स्कायवॉकवर २४ तास विजेचा अपव्यय करण्यात येत आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या महापौर, आयुक्त तसेच एमएमआरडीएचे आयुक्त आदींची भेट घेऊन हा स्कायवॉक हटवण्याची मागणी करणार आहे, असे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents want nana chowk skywalk dismantled
First published on: 07-05-2016 at 00:44 IST