विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध व्हावे, त्यांच्या ज्ञानात भर पडावी या हेतूने काढण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहलींऐवजी आता एखाद्या रिसॉर्ट अथवा तत्सम मनोरंजन पार्कात सहली नेण्याकडे शाळांचा कल वाढू लागला आहे. अशा सहलींचे ‘पॅकेज’ देणाऱ्या दलालांचाही या क्षेत्रात सुळसुळाट झाल्याने शैक्षणिक सहलींचा मूळ हेतूच नष्ट होऊ लागल्याचे चित्र आहे. पॅकेज सहलींमध्ये शाळा व्यवस्थापनातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला सहकुटुंब विशेष खानपान सेवेबरोबरच ‘व्हीआयपी’ वागणुकीची हमी असल्याने या दलालांना सध्या शाळाशाळांमध्ये चांगला भाव आहे. मात्र, या सर्व प्रकारांमुळे पालकांच्या खिशाला तोशीस सहन करावी लागत आहे. शिवाय सहलींबाबत शालेय शिक्षण विभागाचे नियमही अनेक शाळांकडून धाब्यावर बसविले जात आहेत.

डिसेंबर-जानेवारी महिन्यात शाळाशाळांतून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. आता त्यात भर घालायला वेगवेगळ्या रिसॉर्ट आणि मनोरंजन पार्कातर्फे असे पॅकेज देणाऱ्या दलालांचा समावेश झाला आहे. यापैकी काही दलालांचे तर थेट शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे अनेकदा अमूक एका दलालाद्वारेच सहलीचे आयोजन करण्यासाठीचे शाळांवरील दडपणही वाढते. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ५०० रुपयांपासून सुरू होणारी ही पॅकेजे पुढे रिसॉर्टच्या दर्जानुसार वाढत जातात. त्यातही अमूक एवढे विद्यार्थी असतील तर शिक्षक, कर्मचाऱ्यांचा (कधीकधी सहकुटुंबही) खर्च मोफत अशा प्रकरची प्रलोभने दाखवली जातात.
या प्रकारांमुळे यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वात भर टाकण्याच्या दृष्टीने आखल्या गेलेल्या शैक्षणिक सहली, या उद्देशालाच हरताळ फासला जातो, अशी खंत गोरेगावमधील एका शाळेच्या शिक्षकाने व्यक्त केली.

शिक्षण हक्क कायद्यामुळे शाळेच्या शिक्षक-पालक संघाला अनेक अधिकार दिले आहेत. शैक्षणिक सहलीचा निर्णयही याच संघाने ठरविला तर अनेक प्रश्न सुटतील. परंतु, या विषयात शाळांना मार्गदर्शक सूचना देण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नाही.
-बी. बी. चव्हाण, शिक्षण उपनिरीक्षक, दक्षिण मुंबई.

एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी किंवा शहरातीलच महत्त्वाच्या व प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन विद्यार्थ्यांना घडवून बरेच काही साध्य करता येऊ शकेल. परंतु, वेगळा विचार करण्याऐवजी शाळाही रिसॉर्ट अथवा मनोरंजन पार्कातील सहलींचा सहज उपलब्ध होणारा पर्याय निवडतात. या एकसुरी अनुभवामुळे विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व बंदिस्त होऊन जाते. असे विद्यार्थी ‘माझा अविस्मरणीय प्रवास’ या विषयावर निबंध लिहितील ही अपेक्षाच करणे चूक ठरते.
– राजेश पंडय़ा,
हिंदी विषयाचे शिक्षक
एखाद्या रिसॉर्टवर पाण्यात डुंबणे किंवा मनोरंजन पार्कातील खेळ, याव्यतिरिक्त सहलींमध्ये नावीन्य काहीच नसते. त्यात विद्यार्थ्यांला आणि शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या दर्जातही तफावत असते. विद्यार्थी-शिक्षकांमध्ये असा भेदभाव करणाऱ्या या सहलींना ‘शैक्षणिक’ तरी का म्हणावे?
– नवी मुंबईतील शिक्षकाने केलेला उद्विग्न सवाल