दहिहंडी फोडायची असेल तर तळातील थर भक्कम हवा, असे राज ठाकरे वारंवार सांगत असले तरी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीतील मनमानी आणि डावलल्याच्या भावनेमुळे अस्वस्थ असलेल्या मनसेच्या सोळा विभाग अध्यक्षांनी मनसेतीलच ‘बडव्या’च्या विरोधात थेट राज यांचे दार ठोठावले. राज यांनीही शुक्रवारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून योग्य जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले.
 ठाण्यातील मनसेची तब्येत अधिकच तोळामासा आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना शहर अध्यक्षालाच विश्वासात घेण्यात आले नाही. मनसेशी अथवा राजकारणाशी संबंध नाही तसेच ज्यांनी यापूर्वी बंडखोरी केली होती त्यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या. नवीन रचनेत विभाग अध्यक्षांची पदेच रद्द करण्यात आल्यामुळे आपले काय होणार, याचे उत्तरही वीस विभाग अध्यक्षांना मिळत नव्हते. पक्षाने नेमलेल्या संपर्क अध्यक्षांच्या मनमामीमुळे तसेच गटातटाच्या राजकारणामुळे अस्वस्थ झालेल्या उपशहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष यांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर तसेच आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे धाव घेऊन आपले निवेदन दिले. संपर्क अध्यक्ष गिरीश धानुकर यांच्या मनमानी कार्यपद्धतीचा पंचनामा करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
शुक्रवारी राज यांनी वेळ दिल्यानंतर काही माजी शहर उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांनी आपली कैफियत राज यांना सादर केली. राज यांना दिलेल्या निवेदनात विठ्ठलाला कधीही न सोडण्याची भूमिका मांडतानाच, बडव्याच्या मनमानीला आळा घालण्याची विनंतीही या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी मी कोणालाही काढलेले नाही तसेच तुमच्यावर योग्य जबाबदारी सोपविण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन राज यांनी देताच एक समाधान घेऊन ही नाराज मंडळी ठाण्याला परतली.
ज्यांची वरिष्ठ पदांवर नियुक्ती केली त्यातील बहुतेकांकडे चार कार्यकर्तेही नाहीत. आता घाईघाईने उपशहर अध्यक्षांच्या मुलाखतीचा फार्स पार पाडला जात असून शहरातील ६५ प्रभागांसाठी शंभर उमेदवारही मुलाखतीसाठी मिळणार नसतील तर संपर्क अध्यक्षांनी काय काम करून ठेवले ते स्पष्ट होते असेही एका माजी उपशहर अध्यक्षाने सांगितले.