News Flash

चलनकल्लोळाच्या नावाखाली लूट?

पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाला साथ म्हणून मी ऑनलाइन पैसे भरले पण त्यातही माझी फसवणूक झाली.

सेवाकराच्या रूपात हॉटेल व्यावसायिकांकडून जादा बिल आकारणी

निश्चलनीकरणामुळे काळा पैसा व भ्रष्टाचार संपवण्यासाठी एकीकडे सरकारचे प्रयत्न सुरू असताना यामुळे निर्माण झालेल्या चलनकल्लोळात आपले खिसे गरम करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील सुप्रसिद्ध उडीपी हॉटेल ‘स्पेशल आनंद भुवन’ यांच्याकडूनही अशीच ग्राहकांची लूट करण्याचा प्रकार सोमवारी दुपारच्या सुमारास झाला. दुपारी जेवणासाठी आलेल्या एका महिलेने ऑनलाइन पैसे भरण्यासाठी कार्ड दिले असता त्यांच्याकडून सेवा कराच्या नावाखाली पंधरा रुपये जादा आकारले. महिलेने त्याची विचारणा केली असता आम्हाला अनेक कर भरावे लागतात म्हणून ही रक्कम घेतल्याचे हॉटेल व्यवस्थापकाने स्पष्ट केले. पण हॉटेल व्यावसायिकाने सांगितलेल्या रकमेपेक्षाही जास्तीचे पैसे कापले गेल्याने महिलेने ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना सांगितले.

काळ्या पैशावर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ‘कॅशलेस अर्थव्यवहार’ करण्याचे आवाहन आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील तीन महिन्यांत राज्यातील व्यवहार ‘कॅशलेस’ करण्याचे सूतोवाच केले. मात्र, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना हरताळ फासण्याचा निर्णय अनेकांनी घेतल्याचे दिसत असून एरवी रोखीच्या व्यवहारात ग्राहकांची लूट करणारे व्यापारी व व्यावसायिक आता ऑनलाइन व्यवहारांतही ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.

असा अनुभव आलेल्या नंदिनी जोशी यांनी त्यांची कैफियत ‘लोकसत्ता मुंबई’कडे मांडली. त्या म्हणाल्या की, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकासमोरील सुप्रसिद्ध ‘स्पेशल आनंद भुवन’ या हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी मी माझ्या मैत्रिणीसह भोजनासाठी गेले होते.

तेथे आमचे बिल ३५३ रुपये झाले. काऊंटरवर बिल भरण्यासाठी कार्ड पुढे केले असता, हॉटेल व्यवस्थापकाने बिलावर ११ टक्के अधिभार लागेल, असे सांगितले. त्यावर इतके अधिकचे पैसे घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे मी म्हणाले. पण व्यवस्थापकाने माझे ऐकले नाही. अखेर मी अधिभारासह बिल भरण्याची तयारी दर्शवली व त्यांच्याकडून छापील बिल तितक्या रकमेचे देण्याची मागणी केली. मात्र, व्यवस्थापकाने त्याचा इन्कार केला. आमचे बिल ३५३ रुपये होते. त्यावर अधिभार लावून ३६१ रुपये घेण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कार्डद्वारे पेमेंट केल्यानंतर माझ्या खात्यातून ३६८ रुपये कापले गेले. याचा अर्थ माझ्याकडून १५ रुपये जास्त घेण्यात आले. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाला साथ म्हणून मी ऑनलाइन पैसे भरले पण त्यातही माझी फसवणूक झाली. यापूर्वीही अनेकांकडून त्यांनी अशी रक्कम घेतली असेल तर तो या देशव्यापी निर्णयाला फासलेला हरताळ असेच समाजावे लागेल.’

मालकाकडून कबुली

आनंद भुवन हॉटेलच्या अशोक भाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आधी हा व्यवहार योग्य ठरवला. मात्र, त्यांनी बिलावर सांगितलेल्या वाढीव अधिभाराच्या रकमेहूनही अधिक रक्कम आकारल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी ही रक्कम आमच्या व्यवस्थापकाने चुकीने घेतल्याचे अखेर कबूल केले. तसेच त्यांना पैसे परत करण्याचीही तयारी दर्शवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:39 am

Web Title: restaurant owner taking excess bill in the name of service tax
Next Stories
1 दुर्घटना घडू नये यासाठी यंत्रणा उभारणार!
2 शहरबात : पुरातन वारशाचे जतन कोणासाठी?
3 आठवडय़ाची मुलाखत : विकास हवा, पण वारसाही जपावा!
Just Now!
X