जून महिन्यात अर्धा टक्क्य़ांनी वाढलेला सेवाकर त्यात भाज्या आणि डाळी यांच्या आकाशाला भिडणाऱ्या किमतीमुळे शहरात बऱ्याच ठिकाणी हॉटेलात खाणारे ग्राहक टीप देताना हात आखडता घेत असल्याचे समोर आले आहे. पूर्वी २० रुपयांची नोट टीप म्हणून देणारे ग्राहक आता दहा रुपयांची नोट देत आहेत. तर दहा रुपयांची नोट देणारे ग्राहक अवघ्या पाच रुपयांची चिल्लर टेकवत आहेत. त्यामुळे महिन्याअखेर जमणारी टीप अध्र्यावर आल्याने वेटरमंडळीमध्ये निराशा परसली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना महागाईचे गणित सोडवताना असंख्य अडीअडचणींचा सामाना करावा लागत आहे. परिणामी हॉटेलात येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना टीप देताना जड जात आहे. मुंबई व उपनगरात तीन श्रेणीतील हॉटेल्स आहेत. यात अनेक प्रथम श्रेणीतील हॉटेलात टीप स्वीकारली जात नसून पदार्थाच्या किमतीवरच वेटर मंडळीसाठी काही रक्कम बाजूला काढली जाते. दुसऱ्या श्रेणीतील हॉटेलात एक पेटी ठेवली जाते. यात सर्व टेबलवरून मिळणारी टीप एकत्र साठवली जाते. आणि महिन्याअखेरीस किंचन स्टाफ, वेटर आणि सफाई कामगार यांच्यात ठरलेल्या ठरावीक टक्क्य़ांनी विभागण्यात येते, तर तिसऱ्या श्रेणीत येणाऱ्या हॉटेलात टेबल सभाळणाऱ्या वेटरला त्या टेबलवर ठेवण्यात येणारी रक्कम त्या वेटरला मिळत असते. महागाईतही नामांकित हॉटेलच्या वेटरमंडळींना टीपचा फटका बसला नसला तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील हॉटेलात वेटर मंडळींना मिळणाऱ्या टीपचा ओघ कमी झाला आहे. पूर्वी दिवसाला प्रत्येक वेटरला १०० ते १५० रुपयांची टीप मिळत होती. त्यामुळे महिन्याअखेरीस तीन ते साडेतीन हजार रुपयांची अधिक रक्कम वेटर घरी घेऊन जात होते. आता टीप म्हणून मिळणारी रक्कम ४० ते ५० टक्क्य़ांनी घसरली असल्याचे अन्नपूर्णा हॉटेलच्या सुदर्शन शेनॉय या वेटरने सांगितले.

कमाई कमी
पूर्वी अनेक हॉटेलात सेवाकर आकारला जात नव्हता. त्यावेळी ग्राहक बिलाच्या रकमेनुसार दहा रुपयांपासून ते अगदी ४० ते ५० रुपयांपर्यंतची रक्कम टीप म्हणून देण्यात येत होती. ही टीप म्हणजे वेटर मंडळींना अधिक कमाईचा आधार होता. मात्र ग्राहकांनी टीपची रक्कम कमी केल्याने त्याचा फटका वेटर मंडळींना बसला आहे.