ऑक्टोबर महिन्यात उपाहारगृहे सुरू करण्याच्या सरकारच्या भूमिकेचे रेस्टॉरन्ट चालक आणि संघटनांनी स्वागत केले असून, शासन निर्णय आल्यानंतर सर्व रेस्टॉरन्ट सुरू होण्यास किमान १५ दिवस लागतील. कर्मचाऱ्यांची कमतरता, लोकल सेवा सर्वासाठी सुरू नसल्याने दळणवळणात येणाऱ्या अडचणी कायम असून त्यावर उपाय शोधावे लागतील असा अनेक उपाहारगृह मालकांचा सूर दिसून येतो.

शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात उपाहारगृहांना ५० टक्के  क्षमतेने मुभा देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिली. या भूमिकेचे सर्व संघटना तसेच उपाहारगृह मालकांनी स्वागत केले असून उपाहारगृह चालविण्यासाठी अंतिम सर्वसाधारण कार्यपद्धती (एसओपी) कशी असेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

‘सध्या ५० टक्के  क्षमतेने सुरुवात झाली तरी त्यामुळे वीज खर्च, कर्मचारी वेतन असे काही महत्त्वाचे खर्च यातून निघू शकतात. सध्या केवळ पार्सल सेवाच सुरू असल्याने उपाहारगृहातील  इतर सर्व बाबींची तयारी करून साधारण १५ दिवसांत सर्व उपाहारगृहे सुरू होऊ शकतील,’ अशी अपेक्षा फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुर्बक्षसिंग कोहली यांनी व्यक्त केली.

शासनातर्फे नवीन एसओपी, मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यापेक्षा सध्या केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे इतर राज्यात वापरली जात असून, त्याचेच पालन येथे करावे अशी संघटनेची मागणी आहे. ‘शासनाची मार्गदर्शक तत्त्वे, नियमांमध्ये काही अडचणी असून त्या कळविण्यात येतील,’ असे चौपाटी येथील रिव्हाव्हयल रेस्टॉरन्टचे कमलेश बारोत यांनी सांगितले. जो कर्मचारी वर्ग उपाहारगृहाजवळ राहत नाही त्यांना लोकल सेवा सुरू नसल्याने उपाहारगृहांपर्यंत पोहोचण्यातदेखील अडचणी येऊ शकतात, असे बारोत यांनी नमूद केले.

‘शासनाच्या निर्णयानंतर त्यातील नियमांचा अभ्यास करून तसेच आमच्याकडून आणखी खबरदारीचे काय उपाय करता येतील याचा विचार करून त्यानुसार पुढील काम केले जाईल,’ असे गिरगाव येथील विनय हेल्थ होमचे शैलेश देशपांडे यांनी सांगितले. गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधायला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक मोठय़ा उपाहारगृहांमध्ये कर्मचाऱ्यांना मूळ गावाहून बोलावणे हेच सर्वात पहिले काम असल्याचे दिसून येते. चारकोप कांदिवली येथील भगवती रेस्टॉरन्टचे व्यवस्थापक शंकर पुजारी म्हणाले की, या कर्मचाऱ्यांच्या तिकिटाची व्यवस्था करावी लागेल. त्यानंतरच पुढील बाबी सुरू होऊ शकतील.

गेल्या काही वर्षांत वातानुकूलित उपाहारगृहांचे प्रमाण वाढले असून, शासनाच्या एसओपीनुसार २४ अंश तापमान ठेवणे प्रस्तावित आहे. मर्यादित जागेतील उपाहारगृहांना याचा त्रास जाणवू शकतो असाच एकंदरीत सूर उपाहारगृह मालक व्यक्त करत आहेत.

‘सद्यपरिस्थिती पाहता उपाहारगृहे सुरू करण्याबाबत आस्ते कदमच निर्णय घेण्याचा कल असल्याचे,’ दादर येथील तृप्ती रेस्टॉरन्टचे भागवत यांनी सांगितले. तर ‘शासनाचा निर्णय आला तरी, नियमांची पूर्ण माहिती घेऊन, थोडे थांबून, शांतपणे पुढे काय होते हे पाहूनच उपाहारगृह सुरू करण्याचा निर्णय घेणे इष्ट ठरेल,’ असे दादर येथील मामा काणे उपाहारगृहाचे दिलीप काणे यांनी सांगितले.

कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता

शहर आणि उपनगरात वेगवेगळ्या भागांमध्ये विविध सुविधांची अनेक उपाहारगृहे आहेत. दादरसारख्या मध्यवर्ती बाजारपेठेतील उपाहारगृहांचा ग्राहक हा मुख्यत: स्थानिक नसून बाहेरील असतो. सध्या लोकल सेवेची सुविधा अगदीच मर्यादित असणे, इतर दळवळण सुविधांमधील अडचणी या बाबी पाहता अशा उपाहारगृहांना ग्राहकांचा प्रतिसाद कमीच मिळण्याची शक्यता असल्याचे अशा भागातील उपाहारगृह मालकांच्या बोलण्यातून जाणवते.