टाळेबंदीचे निर्बंध आणखी शिथिल करताना राज्यांतर्गत रेल्वेसेवा, उपाहारगृहे आणि बार, तसेच पुण्यातील उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली . धार्मिकस्थळे,  शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे, मेट्रो, व्यायामशाळा मात्र अजून काही काळ तरी बंदच राहतील.

केंद्र आणि राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याबाबत स्पष्टता नसल्यामुळे त्या सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची निराशा झाली.

‘पुन्हा सुरुवात’ या राज्य सरकारच्या मोहिमेंतर्गत ऑक्टोबर महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये उपाहारगृहे, बार आणि राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच टाळेबंदी ३१ ऑक्टोबपर्यंत राज्यात लागू राहणार असून, सध्या कायम असलेले निर्बंध यापुढेही लागू राहणार आहेत. शहरी भागातील बाधितांची संख्या कमी होत आहे. पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांबरोबरच ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे सर्व स्तरातून मागणी होत असतानाही धार्मिकस्थळे आणखी काही दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईप्रमाणेच पुण्यातही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून त्याबाबत समन्वयाची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वेवर पडणारा ताण लक्षात घेऊन उपनगरी गाडय़ांची संख्या वाढविण्याचे आदेश रेल्वेला देण्यात आले असून मुंबईतील डबेवाल्यांना ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून या गाडय़ांतून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

येत्या सोमवारपासून (५ ऑक्टोबर) ५० टक्के  क्षमतेत उपाहारगृहे, फू ड कोर्ट  आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबत पर्यटन विभाग स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार असून त्याची अंमलबजावणी करीत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व उद्योग, उत्पादन व्यवसाय तसेच व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

असे असले तरी धार्मिक स्थळे खुली करण्याची विरोधकांची मागणी मात्र सरकारने मान्य के लेली नाही.   मेट्रो रेल्वे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, तरणतलाव, नाटय़गृहे, सभागृहे, आंतराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक सोहळ्यावरील बंदी कायम राहणार आहे.

केंद्राकडून निर्बंध शिथिल, राज्याची बंधने कायम

टाळेबंदीत सवलत देताना केंद्र सरकारने विविध निर्बंध शिथिल केले असले तरी राज्यात यातील अनेक निर्बंध अद्यापही कायम आहेत. यामुळे के ंद्राने दिलेल्या सवलती राज्यात लागू होऊ शकलेल्या नाहीत. शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास केंद्राने मान्यता दिली असली तरी राज्य सरकारने बुधवारी लागू के लेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये महिनाभर बंदी कायम राहणार आहे.

* धार्मिकस्थळे – के ंद्राची मान्यता – राज्यात बंदी

* शैक्षणिक संस्था – १५ ऑक्टोबरपासून केंद्राची परवानगी  – राज्यात बंदी

* व्यायामशाळा – केंद्राची याआधीच परवानगी   – राज्यात बंदी

* मेट्रो रेल्वे – केंद्राची मान्यता – राज्यात बंदी

* उपनगरीय रेल्वे  – केंद्र व राज्य फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना मुभा

* चित्रपटगृहे – केंद्राची १५ ऑक्टोबरपासून परवानगी – राज्यात बंदी

काय सुरू होणार ?

*    राज्यांतर्गत रेल्वेसेवा (मुंबई-पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर , रत्नागिरी आदी )

*  उपाहारगृहे, बार (सोमवार, ५ ऑक्टोबरपासून)

*  मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व उद्योग, आस्थापना

*  पुणे शहरातील उपनगरीय रेल्वे सेवा

हे बंदच

*  धार्मिकस्थळे, शाळा-महाविद्यालये, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, तरणतलाव, नाटय़गृहे, सभागृहे, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम