करोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील उपाहारगृहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होण्याचे संकेत आहेत. उपाहारगृहांबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होताच पुढील आठवडय़ापासून किमान ५० टक्के क्षमतेत उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी हॉटेल-उपाहारगृह व्यावसायिकांच्या संघटनांना दिली.

राज्य सरकारने ‘पुन्हा सुरुवात’ या मोहिमेंतर्गत गेल्या चार टप्प्यांत दुकाने, उद्योग, व्यवसाय, निवासी हॉटेल, दळणवळण पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, व्यायामशाळा, नाटय़गृह, चित्रपटगृहे, तरण तलाव आणि उपाहारगृहे, बार आणि रेस्टॉरंट आदींवरील निर्बंध मात्र कायम ठेवले आहेत. सध्या उपाहारगृहांमधून घरपोच पदार्थ मिळतात. ऑक्टोबरपासून उपाहारगृहांमध्ये बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येऊ शकेल. त्यासाठी टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात १ ऑक्टोबरपासून आणखी काही निर्बंध शिथिल करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. केंद्र सरकारकडून ऑक्टोबर महिन्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होताच, राज्य सरकार आपली मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील उपाहारगृह व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा करताना उपाहारगृहे सुरू करण्याची परवानगी देण्याचे संकेत दिले.

करोनाचे संकट मोठे असून, या संकटकाळात निवासी हॉटेल आणि उपाहारगृह व्यावसायिक सरकारबरोबर असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. करोनावर आजही लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे करोनासह जगताना अत्यंत काळजीपूर्वक वाटचाल करावी लागणार आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते. ते त्यातील काही व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही महत्त्वाचे आहे. केंद्र शासनाकडून वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून मिळणारे हजारो कोटी रुपयांचा निधी थकीत आहे. या सर्व आर्थिक अडचणींची सरकारला जाणीव आहे. त्यामुळेच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेवूून व्यवहार सुरळीत करण्यावर सरकारचा भर असून, काही नियमांच्या माध्यमातून उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. सर्व उपाहारगृहे व्यावसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करू, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वेळी सांगितले.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून उपाहारगृहे पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरण्ट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष एस. के. भाटिया यांनी दिली. करोनाबाबत उपाहारगृहात घ्यावयाच्या काळजीबाबत संबंधिताना प्रशिक्षण देण्यात आले असून, सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या (आहार) संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

नियमांचे पालन आवश्यक

उपाहारगृहांमध्ये मुखपट्टीचा वापर, हात धुणे, अंतरनियम पाळणे या तिन्ही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक असून, तेथील आचारी (शेफ), सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उपाहारगृहाची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून या सर्वाचा विचार करून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहे. त्यावर शिक्कामोर्तब होताच उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दिवसभरात ११,९२१ रुग्ण, २० हजार जण करोनामुक्त

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ११,९२१ नवे रुग्ण आढळले. याच कालावधीत सुमारे २० हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. १८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या २ लाख ६५ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत मुंबईतील रुग्णसंख्या दोन लाखांवर गेली असून, यापैकी १ लाख ६४ हजार रुग्ण बरे झाले आहेत.