|| प्रसाद रावकर

गणेशोत्सवात सहा दिवस परवानगी देण्याची मागणी

मुंबई : यंदा गणेशोत्सवातील चार दिवस सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र आणखी दोन दिवस मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी मिळावी यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून साकडे घातले आहे.

ध्वनिप्रदूषणामुळे होणारा ऱ्हास, तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत न्यायालयाने रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई केली आहे. मात्र उत्सव, जयंती आदींच्या निमित्ताने वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे. हे १५ दिवस निश्चित करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपविण्यात आली होती. मात्र आता ती जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवातील चार दिवस सकाळी ६ ते मध्यरात्री १२ या वेळेत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवातील पहिला, चौथा, पाचवा (गौरी गणपती विसर्जन) आणि दहावा (अनंत चतुर्दशी) या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. मात्र या चारपैकी पहिल्या दिवशी गणेश आगमन असते, तर पाचव्या आणि दहाव्या दिवशी गणेश विसर्जन सोहळा असतो. त्यामुळे अन्य दिवशी आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम रात्री १० पर्यंत आटोपते घ्यावे लागतात, तर विसर्जनाच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करता येत नाहीत, अशी खंत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजाची सांस्कृतिक कार्यक्रमांशी नाळ जोडली जाते. त्यातून कलावंत तयार होतात. गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मराठी नाटय़सृष्टीला अनेक कालाकार मिळाले आहेत. पूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत होते. मात्र आता वेळेची मर्यादा असल्यामुळे अशा कार्यक्रमांपासून अनेकांना वंचित राहावे लागते, अशी व्यथा अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी मांडली.

निर्णय प्रलंबीत

मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी असलेल्या १५ पैकी १३ दिवस उत्सव, जयंती आणि अन्य बाबींसाठी निश्चित करण्यात आले आहेत. अद्याप दोन दिवस शिल्लक आहेत. गणेशोत्सव १० दिवसांचा असतो. त्यामुळे आणखी दोन दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून केली आहे. अद्याप या पत्रावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे समजते.