गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांकडून जाहिरातदार आणि प्रायोजक कंपन्यांच्या झळकावल्या जाणाऱ्या बेसुमार बॅनर्सना मुंबई महापालिकेने चाप लावला आहे. या जाहिरात फलकांमुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी प्रत्येक मंडळाला केवळ दोनच बॅनर्स लावण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, यामुळे गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याने त्यांनी याला विरोध केला आहे. या पाश्र्वभूमीवर ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’च्या पदाधिकाऱ्यांबरोबर पालिका अधिकाऱ्यांची सोमवारी होणारी बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई विद्रूप करणारे बॅनर्स तात्काळ हटवून अनधिकृत बॅनर्सविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने कारवाई केली व यासंबंधात धोरण निश्चित होईपर्यंत राजकीय बॅनरबाजीवर बंदी आणली. मात्र, गणेशोत्सवाचे निमित्त साधून या जाहिरातबाजीला पुन्हा ऊत येण्याची भीती आहे. त्यामुळे केवळ दोन फलक लावण्याची परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बडय़ा कंपन्या, शैक्षणिक संस्था व व्यक्तींकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जाहिरात झळकविण्याच्या बदल्यात मोठय़ा रकमेची मदत केली जाते. मात्र अशा पद्धतीने मंडळाला मदत करणाऱ्या कंपन्या, संस्था व व्यक्तींचे नाव आणि लोगो दहा बाय दहा आकाराच्या केवळ दोन अ‍ॅक्रलिकच्या बॅनरवर लिहून ते मंडपाच्या दर्शनी भागात झळकविण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सांगितले.
फेरविचार करावा!
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १० हजाराच्या वर आहे. कंपन्या, संस्था आणि व्यक्तींकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतूनच ही मंडळे गणेशोत्सवाचा खर्च भागवितात. त्या मदतीच्या बदल्यात जाहिरातीचे बॅनर मंडपस्थळी झळकविण्यात येतात. पालिकेच्या निर्णयामुळे मंडळांना आर्थिक मदत मिळणे अवघड होईल. पालिकेने  निर्णयाचा फेरविचार करावा.
अ‍ॅड. नरेश दहिबावकर
अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती