तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे सावधगिरी; लोकलसाठी प्रतीक्षाच

मुंबई : मुंबईतील करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मुंबईत सोमवारपासून सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतेही बदल क रण्यात आलेले नाहीत. राज्य सरकारच्या निकषांनुसार मुंबईचा समावेश आता टप्पा एकमध्ये झालेला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी टप्पा तीनचेच निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठी मुंबईकरांना वाट पाहावी लागणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने दोन आठवडय़ांपूर्वी निकष तयार के ले होते. तेव्हा मुंबईत बाधितांचे प्रमाण  पाच टक्क्यांपेक्षा जास्त होते. मात्र दोन आठवडय़ांनी मुंबईतील परिस्थिती सुधारत असून बाधितांचे प्रमाण घटले आहे. असे असले तरी मुंबईला तिसऱ्या टप्प्याचेच निर्बंध लागू करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यामुळे दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये यांच्यावर सध्याचेच निर्बंध राहणार आहेत.

मुंबईतील बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे अजूनही दरदिवशी ६०० ते ७०० नव्या रुग्णांची नोंद होते आहे. ही संख्या दर दिवशी दीडशे ते दोनशेवर आल्यास किंवा रुग्णांचे प्रमाण दोन टक्क्यांच्या खाली आल्यास निर्बंध शिथिल करण्याचा विचार होईल, असेही आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी सूतोवाच के ले होते. लोकलही एवढय़ात सुरू करण्याबाबतही त्यांनी असमर्थता दर्शवली होती. लोकल सुरू करतानाही ती टप्प्याटप्प्याने म्हणजेच आधी महिलांसाठी किं वा विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी अशा पद्धतीने सुरू के ली जाण्याची शक्यताही आयुक्तांनी वर्तवली आहे. त्याबाबत पुढील आठवडय़ात निर्णयाची शक्यता आहे.

मुंबईचा समावेश पहिल्या टप्प्यात

राज्य सरकारच्या निकषांनुसार या आठवडय़ात मुंबईतील करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ( संसर्ग दर) ३.७९ टक्के  होते. तर प्राणवायूच्या २३.५६ टक्के  खाटा व्यापलेल्या आहेत. राज्य सरकारच्या निकषांनुसार मुंबईचा समावेश आता पहिल्या टप्प्यात झाला आहे. मात्र तरीही पालिके  ने मुंबईला तिसऱ्या टप्प्याचेच निर्बंध लागू के  ले आहेत.

कारणे काय?

मुंबईची भौगोलिक रचना व लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण तसेच मुंबई महानगर प्रदेशातून लोकलने दाटीवाटीने प्रवास करून मोठय़ा संख्येने दररोज येणारे प्रवासी यांचा विचार करता हे निर्बंध शिथिल करता येणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच टास्क फोर्स व तज्ज्ञांनी येत्या काही आठवडय़ात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असल्यामुळे सावधगिरी बाळगत प्रशासनाने निर्बंध कायम ठेवण्याचे ठरवले आहे.