दुकानांच्या वेळा वाढवण्याचा प्रस्ताव; उपनगरी रेल्वे प्रवासावर मात्र निर्बंधच

मुंबई : राज्यातील करोनास्थिती सुधारत असून, बाधितांचे प्रमाण घटू लागले आहे. मात्र, २१ जिल्ह्यांत फैलाव कायम असून, म्युकरमायकोसिसच्या संकटाचा धोका लक्षात घेऊन टाळेबंदीत १५ दिवस वाढ करण्याबाबत गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली. काही निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असून, दुकानांच्या वेळा वाढविण्यासह अन्य काही सवलती देण्याचा प्रस्ताव आहे. उपनगरी रेल्वे प्रवासावरील निर्बंध मात्र कायम राहतील.

करोनाची साखळी तोडण्यासाठी ५ एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद आहेत. १४ एप्रिलच्या रात्रीपासून राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने टाळेबंदी उठविण्याची मागणी होत आहे. व्यापाऱ्यांनी १ जूनपासून दुकाने उघडण्याचा इशारा दिला आहे. मात्र, सरकार कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. आरोग्य विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील  करोनास्थितीवर सादरीकरण करताना, २१ जिल्ह्यांतील रुग्णवाढ राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असून, १०-१५ जिल्ह्यांत रुग्णवाढीचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आणले.

राज्यातील टाळेबंदी पूर्ण उठवायची की टप्प्याटप्प्याने शिथिल करायची, अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकारी मंत्र्यांना केली. त्यावर काही जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर असल्याची बाब मंत्र्यांनी निदर्शनास आणली. रुग्णवाढीचे प्रमाण हळूहळू कमी होत असले तरी ग्रामीण भागांत ते वाढत आहे. शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. आजची राज्यातील रुग्णसंख्या कमी कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारीइतकी झाली आहे. मात्र आणखी काळजी घेणे आवश्यक आहे. टाळेबंदीत वाढ करावी आणि टप्प्याटप्प्याने काही निर्बंध शिथिल करावेत, असा मंत्रिमंडळाचा सूर होता.

मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेतून सर्वसामान्य प्रवाशांना आणखी महिनाभर तरी प्रवास करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता नाही. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासास मुभा आहे. यात आणखी कोणत्या घटकांना परवानगी दिली जाणार नाही. रेल्वे परवानगीबाबत १५ जूनपर्यंत तरी विचार होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

तमिळनाडूमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २,११,२९८ रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक म्हणजे ३३,७६४ रुग्ण तमिळनाडूमध्ये आढळले. त्यापाठोपाठ केरळमध्ये २८,७९८ रुग्णांची नोंद झाली. या दोन्ही राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या.

कोणते निर्बंध शिथिल?

  • व्यापाऱ्यांनी सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली असली तरी सरकारच्या पातळीवर अद्याप विचारविनिमय सुरू आहे.
  • सध्या सकाळी ७ ते ११ पर्यंत जीवनावश्यक दुकाने उघडी ठेवता येतात.ही वेळ दुपारी २ पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. अन्य दुकाने आणखी आठवडाभर तरी उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे सांगण्यात येते.
  • आरोग्य विभाग आणि कृती दलाशी चर्चा करून कोणते निर्बंध शिथिल करावेत, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  घेणार आहेत. दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात मोठी रुग्णघट; २१,२७३ नवे रुग्ण

मुंबई : राज्याचा रुग्णआलेख घसरत असून, गुरुवारी मोठी रुग्णघट नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत करोनाचे २१,२७३ नवे रुग्ण आढळले असून, ४२५ जणांचा मृत्यू झाला. जवळपास दोन महिन्यांनी दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. राज्यात सध्या ३ लाख रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४३,८६९ रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत.

दुसरी लाट ओसरू लागली… देशात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. २४ राज्यांमधील उपचाराधीन रुग्णसंख्याही घटत असून, करोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. करोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. मात्र चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणातही गेल्या तीन आठवड्यांपासून घट होत आहे, असे केंद्राने म्हटले आहे.