‘आवाज’ उतरला
समाजस्वास्थ बिघडविणाऱ्या कानठळी उत्सवांना उच्च न्यायालयाने र्निबधाचे वेसण घातले. याचे दृश्य आणि अदृश्यही परिणाम रविवारी दहीहंडीच्या निमित्ताने पाहायला मिळाले. अर्थात, न्यायालयाचे अनेक र्निबध धुडकावून लावण्यात आले असले तरी काही बाबतीत तरी या कानठळी उत्सवाला आळा बसल्याचे दिसून आले. एक म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा जखमी होणाऱ्या गोविंदांची संख्या कमी होती. तसेच, आवाजाची पातळीही गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच उतरली होती.
वाहतूक, ध्वनी, रस्त्यावरचे मंडप अशा अनेक बाबतीतले नियम धाब्यावर बसवून साजऱ्या केल्या जाणाऱ्या दहीहंडीमधील उन्माद उच्च न्यायालयाच्या र्निबधांमुळे यंदा काहीसा ओसरला होता. त्याचा पहिला अदृश्य परिणाम दिसला तो ध्वनी प्रदूषणाच्या निमित्ताने. शहरातील ध्वनी प्रदूषणावर कानात तेल टाकून लक्ष ठेवणाऱ्या ‘आवाज फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी आवाजाची नोंदणी घेत यंदाच्या वर्षी डीजे, ढोलताशे यानिमित्ताने कानठळ्या बसविणारा ‘आवाजी’ उच्छाद उतरल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
‘यंदा र्निबधांमुळे अनेक राजकीय मंडळींनी दहीहंडीच्या आयोजनातून माघार घेतली होती. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी अनेक ठिकाणी आवाजाची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच उतरली होती,’ असे फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुली यांनी सांगितले.
अर्थात, ज्यांनी ज्यांनी आयोजन केले होते, त्यांनी लाऊडस्पीकरबाबतच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या संबंधात आवाज उठविणाऱ्या रहिवाशांच्या तक्रारींची दखलही पोलीस घेत नव्हते. तसेच या संबंधातील तक्रारी जाहीर करण्यात याव्यात, या न्यायालयाच्या सूचनेचेही पालन करण्यात आलेले नाही, अशा शब्दांत त्यांनी नापसंती व्यक्त केली. ही नाराजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून व्यक्त केली आहे.
मुंबईत आवाजाची पातळी ओलांडण्याचे प्रमाण खार आणि वरळी परिसरात अधिक होते. खारमध्ये सायंकाळच्या सुमारास १०० ते १०५ डेसिबल्स इतकी आवाजाची पातळी नोंदविण्यात आली. ही अर्थातच ध्वनीविषयक नियमांचे उल्लंघन करणारी आहे. राजकारण्यांच्या पुढाकाराने आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये तर सर्रास नियमांचे उल्लंघन केले गेले आहे, असे निरीक्षणही संस्थेने नोंदविले आहे.
आठ ते दहा रुग्णालये असलेल्या ठाण्याच्या गोखले मार्गावर दरवर्षी पाच ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी आवाजाची पातळीही नियमभंग करणारी असते. यंदा मात्र या ठिकाणी एकही दहीहंडी नव्हती, असे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदविले.
नवी मुंबईत अनेक मोठय़ा दहीहंडी आयोजकांनी माघार घेतल्याने तुलनेत आवाजाची पातळी कमी होती, असे अजय म्हात्रे यांनी सांगितले. परंतु ट्रकमधून फिरणारे गोविंदा पथक सर्रास हॉर्न वाजवून, लाऊडस्पीकर आणि ढोलताशे वाजवून वातावरणातील शांतता चिरण्याचे काम करीत होते.