News Flash

‘डेल्टा प्लस’पासून संरक्षणाकरिता निर्बंध लागू ठेवणे अपरिहार्य – तज्ज्ञांचे मत

डेल्टा प्लस हा डेल्टाचा उपप्रकार असून डेल्टाच्या संसर्ग प्रसाराचा वेग आणि संसर्गाची तीव्रता दोन्ही अधिक असल्याचे दुसऱ्या लाटेत अनुभवले आहे.

Coronavirus-01
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई: डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या उपप्रकाराचा प्रसाराचा वेग, संसर्गाची तीव्रता आणि लशीची परिणामकारकता याबाबत अद्याप ठोस माहिती नसली तरी हा प्रकार चिंताजनक असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपायावर भर देण्याशिवाय पर्याय नाही. राज्यात ७० टक्के लसीकरण आणि बाधितांचे प्रमाण सलग १४ दिवस पाच टक्क्यांखाली जात नाही तोपर्यंत निर्बंध लागू ठेवणे अपरिहार्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डेल्टा प्लस हा डेल्टाचा उपप्रकार असून डेल्टाच्या संसर्ग प्रसाराचा वेग आणि संसर्गाची तीव्रता दोन्ही अधिक असल्याचे दुसऱ्या लाटेत अनुभवले आहे. तसेच अजूनही मुंबईसारख्या शहरांमध्येही रुग्णसंख्या कमी झाली तरी प्रतिदिन रुग्णसंख्याही अजूनही ६०० ते ८०० दरम्यान आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटवण्याचा धोका अधिक आहे, असे मत करोना कृतिदलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

डेल्टा प्लस हा चिंताजनक विषाणूचा उपप्रकार असून याचा वेग, संसर्गाची तीव्रता आणि लसीकरणालाही दाद न देण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्रीय आरोग्य विभागानेही दिला आहे.

परंतु आपल्याकडे आढळलेल्या रुग्णांची संख्या मुळातच अगदी कमी आहे. त्यात या रुग्णांमध्ये डेल्टाच्या तुलनेत लक्षणांमध्ये फारसा फरक आढळलेला नाही. काही रुग्णांमध्ये अतिसार, उलटी आणि पोटाचे काही विकार ही वेगळी लक्षणे आढळली आहे. त्यामुळे सध्या औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय तरी समानच आहेत.

अधिक माहिती प्राप्त होईपर्यत निर्बंध लागू ठेवणे हेच योग्य असल्याचे करोना कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

डेल्टा प्लसचा धोका वाढू नये यासाठी लवकरात लवकर किमान ७० टक्के लसीकरण करणे आवश्यक आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमधून बाधितांचे प्रमाण सलग १४ दिवस पाच टक्क्यांखाली असेल, तेव्हाच निर्बंध हटविणे योग्य आहे. अन्यथा प्रसाराचा वेग वाढल्यास तिसरी लाट येण्यासही वेळ लागणार नाही, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

राज्यात आढळलेल्या डेल्टा प्लस विषाणूबाधितांपैकी ११ जणांना सौम्य लक्षणे होती, एका रुग्णाला अतिसार आणि एका रुग्णाला वास येत नव्हता. यांच्यामध्ये सौम्य ते मध्यम लक्षणेच दिसून आली असून रत्नागिरीतील एका मृत्यूव्यतिरिक्त सर्व रुग्ण बरे झालेले आहेत.

त्यामुळे सध्या तरी चिंताजनक असे काही या जिल्ह्यांमध्ये आढळलेले नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 2:53 am

Web Title: restrictions on delta plus protection are inevitable akp 94
Next Stories
1 डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त
2 घरोघरी लसीकरणास लवकरच सुरुवात
3 माजी पोलीस आयुक्तांच्या मुलास अटक
Just Now!
X