औषधांच्या नामसाधर्म्यामुळे  निर्माण होणारे संभ्रम, एकाच नावाने बाजारात उपलब्ध असलेली अनेक औषधे किंवा बनावट औषधे याला चाप लावण्यासाठी अखेर केंद्रीय आरोग्य विभागाने औषध कंपन्यांवर कायद्याचे निर्बंध आणले आहेत.

बाजारात उपलब्ध ट्रेडमार्क, ब्रॅण्डच्या नावाने किंवा त्याच्याशी मिळत्याजुळत्या नावाने औषध बाजारात विक्रीस आणण्यास यापुढे परवानगी नाही, असे अधिसूचनेद्वारे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

औषधांच्या नामसाधर्म्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच औषधांच्या नावातील सारखेपणा रुग्णांच्या जिवावर कसा बेतू शकतो याची माहिती देणारे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध करून यावर चर्चा घडविली होती. औषधांच्या नावातील (ब्रॅण्ड) सूक्ष्म वेगळेपणा लक्षात न आल्याने अशक्तपणा घालविण्याऱ्या ‘फॉलिमॅक्स’ या औषधाऐवजी कर्करोगासाठी दिल्या जाणाऱ्या ‘फॉलिट्रॅक्स’ हे औषध दिल्याने मालाड येथील दिगंबर धुरी यांचे १५ ऑक्टोबर २०१८ रोजी निधन झाले होते. या प्रकरणी संबंधित औषधविक्रेत्याचा परवानाही रद्द करण्यात आला.

राज्य अन्न व औषध प्रशासनाने हा मुद्दा उचलून धरत केंद्रीय औषध नियंत्रक विभागाकडे औषधांच्या नामसाधर्म्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत पत्राने कळविले होते. केंद्रीय औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. अखेर केंद्रीय आरोग्य विभागाने अधिसूचना काढून नामसाधर्म्य असलेल्या औषधांच्या विक्रीवर निर्बंध आणले.

अधिसूचना

मंडळाच्या सूचनेनुसार औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यामध्ये बदल केल्याचे अधिसूचनेद्वारे केंद्रीय आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केले आहे. या अधिसूचनेनुसार, एखादे औषध कंपनीला बाजारात ब्रॅण्ड किंवा ट्रेडमार्कने बाजारात आणायचे असल्यास त्या नावाशी मिळतेजुळते औषध देशभरात बाजारामध्ये उपलब्ध नाही, अशी लेखी हमी कंपनीने परवाना देणाऱ्या औषध विभागाला देणे बंधनकारक असेल. प्रस्तावित केलेले ब्रॅण्ड किंवा ट्रेडमार्कच्या नावामुळे संभ्रम किंवा फसवणूक होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.