24 February 2021

News Flash

राज्यात उत्तुंग इमारतींसाठी निर्बंध शिथिल

मुंबईत हे निर्बंध कायम ठेवण्यात आले आल्यामुळे मंजुरी बंधनकारक आहे.

 

संदीप आचार्य/निशांत सरवणकर

मुंबई : मुंबई तसेच संबंधित नियोजन प्राधिकरण वगळता राज्यातील उत्तुंग इमारतींच्या परवानगीसाठी आता  खेटे घालावे लागणार नाहीत. गेली दोन वर्षे प्रतीक्षेत असलेली एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली महाविकास आघाडी सरकारने लागू केली असून त्यामुळे १२० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींसाठी उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी घेण्याची अट त्यात काढून टाकण्यात आली आहे. मुंबईत हे निर्बंध कायम ठेवण्यात आले आल्यामुळे  मंजुरी बंधनकारक आहे.

सर्व महापालिका, नगरपालिका, महानगर परिसरांना ही सवलत देण्यात आल्यामुळे आता राज्यात उत्तुंग इमारती दिसू शकणार आहेत. नव्या नियमावलीमुळे चटईक्षेत्रफळ वापरावरील निर्बंध शिथील झाले आहेत. त्यामुळे उत्तुंग इमारतींचा मार्गही मोकळा झाला आहे. परंतु १२० मीटरपेक्षा उंच इमारतींसाठी याबाबत नेमण्यात आलेल्या समितीकडून विशेष मंजुरी घेणे आवश्यक असते. मात्र ही अटच काढून टाकण्यात आली आहे. या समितीची मंजुरी मिळण्यास बराच विलंब लागत होता. त्यामुळे प्रकल्प तयार असूनही रखडत होता. उच्चस्तरीय समितीपुढे परवागीसाठी मंजुरी मिळविताना विकासकांना या समितीने आखून दिलेल्या मानांकनाचे पालन करावे लागत होते. आता मात्र ही अटच काढून टाकण्यात आल्यामुळे विकासक मंडळी खुश झाली आहेत. महानगर क्षेत्रातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांना त्यामुळे फायदा होणार आहे. या निर्णयामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुंबईत १२० मीटरपर्यंतच्या (४० मजले) उत्तुंग इमारतींना परवानगी देण्याचे अधिकार महापालकिा आयुक्तांना आहेत. मात्र त्यावरील उंचीच्या इमारतींसाठी उच्चस्तरीय समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या समितीची स्थापना करण्यात आली आहे.  विकासकांनाही या समितीकडून मंजुरी घेऊन आवश्यक बनले होते. परंतु परवानगी मिळण्यात विलंब होत असल्यामुळे अनेक प्रकल्प रखडले होते. आता ती अडचण दूर होणार आहे. या नियमावलीत ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर, कोल्हापूर आदी  पालिकांमध्ये विशिष्ट परिसरात उत्तुंग इमारतींच्या उंचीवर वेगवेगळे निर्बंध घालण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 3:28 am

Web Title: restrictions on high rise buildings in the state relaxed akp 94
Next Stories
1 सहकारी संस्थांची सरकारकडूनच कोंडी
2 मुंबईतील ४० खासगी रुग्णालये धोकादायक
3 राज्यात २ लाख ८२ हजार असंसर्गजन्य रुग्णांची नोंदणी
Just Now!
X