26 November 2020

News Flash

धार्मिक स्थळांवरील निर्बंध कायम

राज्य सरकारचा निर्णय; चित्रपटगृहेही आणखी महिनाभर बंद

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यातील करोना स्थिती काहीशी आटोक्यात आली असली आणि विरोधकांनी कितीही दबाव टाकला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील धार्मिक स्थळे आणखी महिनाभर बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला.

टाळेबंदी शिथिलीकरणांतर्गत देण्यात आलेल्या सवलती आणि लागू असलेले निर्बंध आणखी महिनाभर कायम ठेवण्यात येणार असल्याने शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे आणखी काही दिवसांसाठी बंदच राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

राज्यातील करोनास्थिती सध्या नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. दररोज बाधितांची संख्या कमी, तर या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी राज्यातील करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता ९० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सिनेमागृहे पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच उपनगरी रेल्वे सर्वासाठी सुरू करण्यावरूनही सरकारवरील दबाव वाढत आहे.

धार्मिक स्थळे विशेषत: मंदिरे खुली करण्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या वादानंतर राज्य सरकार धार्मिक स्थळांबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वाना उत्सुकता होती. मात्र ‘मिशन बिगीन अगेन’ उपक्रमाअंतर्गत गेले महिनाभर लागू करण्यात आलेली मार्गदर्शक नियमावली नोव्हेंबर महिन्यातही कायम ठेवण्याचा म्हणजेच आणखी महिनाभर टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील धार्मिक स्थळे आणखी महिनाभर बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याआधी राज्यात ५० टक्के क्षमतेत उपाहारगृहे, फूड कोर्ट आणि मद्यालये (बार) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत हीच नियमावली कायम राहील. त्याचप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्याबाबत सरकारने सकारात्मकता दाखविली असली तरी त्याबाबतचा कोणताही निर्णय नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये जाहीर झालेला नाही.

आदेशात काय?

* शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थामध्ये ऑनलाइन शिक्षण तसेच अन्य कामांसाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यास परवानगी देण्यात आली असली तरी शाळा- महाविद्यालये आणखी महिनाभर बंदच राहणार आहेत.

* दिवाळीपूर्वी चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी ती कधी सुरू होणार याबाबत आजच्या आदेशात स्पष्टता नसल्याने चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत.

* तरणतलाव, नाटय़गृहे, सभागृहे तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सोहळ्यावरील बंदी आणखी महिनाभर कायम राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 12:19 am

Web Title: restrictions on religious places remain abn 97 2
टॅग Coronavirus
Next Stories
1 आगार, बस स्थानके तारण ठेवून एसटीची २ हजार कोटींची कर्जउभारणी
2 विधान परिषदेसाठीच्या नावांबाबत तीनही पक्षांकडून गुप्तता..
3 महापालिकेच्या कंत्राटदाराला पावणे तीन कोटींचा गंडा
Just Now!
X