केंद्रीय आरोग्य विभागाच्या नव्या मसुद्यात नियमावली

हॉटेल किंवा सोहळय़ा-समारंभात उरलेले अन्न गरजू व्यक्तींमध्ये वाटण्याचे सामाजिक भान आता वाढू लागले आहे. असे अन्नपदार्थ गोळा करून ते गरिबांमध्ये वाटणाऱ्या संस्थाही कार्यरत आहेत. मात्र, अनेकदा या अन्नपदार्थाची आरोग्यदृष्टय़ा तपासणी करण्यात येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन ‘सरप्लस फूड’ अर्थात उरलेल्या अन्नपदार्थाचे दान वा मोफत वाटप करण्यावर कायद्याने निर्बंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण कायद्यामध्ये बदल करण्यासाठी मसुदा तयार केला असून त्यात अतिरिक्त अन्नपदार्थ दान करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यावसायिक यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. हा मसुदा हरकती व सूचनांसाठी खुला करण्यात आला आहे.

या मसुद्यानुसार अनावश्यक अन्नाचे संकलन करून गरजूंना वाटप करणाऱ्या संस्थांनी प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक असेल. या संस्थाकडे अन्नाचे वाटप करण्यासाठी दळणवळणाची, जतन करण्यासाठी शीतगृहे आणि अन्नपदार्थ गरम करण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. नासलेल्या अन्नाचे वाटप करू नये, असे या मसुद्यात नमूद केले आहे.

अन्नदाता आणि वाटप करणाऱ्या संस्थांनी दान केलेल्या अन्नाच्या नोंदी करून ठेवणे आवश्यक आहे. अन्नपदार्थाचे दान करण्यापूर्वी त्यावर संबंधित माहितीचे लेबल उपलब्ध असणे आवश्यक असेल. पॅकिंग किंवा वेष्टन असलेले अन्नपदार्थ दान करताना त्यावर अन्नपदार्थाचे नाव, निर्मितीची माहिती, अन्नघटकांची यादी आणि अन्नाची कालमर्यादा आदी इत्थंभूत माहितीचे मूळ लेबल असणे गरजेचे आहे. तसेच तयार केलेले अन्न दान करताना त्यावर अन्नपदार्थाच्या नावासह प्रकार (शाकाहारी -मांसाहारी), निर्मिती करणाऱ्याची माहिती, तयार केलेल्याची आणि कालमर्यादा आदी माहिती नमूद करावी. लेबलवरील माहिती स्पष्टपणे दिसेल अशा स्वरूपात लिहिलेली असेल, असे या मसुद्यात स्पष्ट केले आहे.

या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी राज्य सरकारच्या अन्न व सुरक्षा विभागाअंतर्गत समितीची नेमणूक केली जाईल. या समितीमध्ये प्रशासनाचे दोन अधिकारी, ग्राहक हक्क विभागातील एक प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचा प्रतिनिधी, अन्नवाटप करणाऱ्या संस्थेचा एक प्रतिनिधी आदी सभासद असतील.

‘अन्नाची योग्य पद्धतीने साठवण’

केंद्रीय आरोग्य विभागाने तयार केलेल्या मसुद्याबद्दल रोटी बँकेचे कार्यकारी व्यवस्थापक जयद्रथ तांबे यांनी समाधान व्यक्त केले. अन्नाची इत्थंभूत माहिती घेणे आणि त्याचा तपशील लिहिणे महत्त्वाचे असून या कायद्यामुळे यात होणारी हलगर्जी टाळता येईल, असे ते म्हणाले. ‘रोटी बँक’तर्फे अन्न गोळा करताना योग्य काळजी घेण्यात येते, असेही त्यांनी नमूद केले.

‘दिवसातून दोन वेळा अन्न गोळा केल्यानंतर एक ते दोन तासांत त्याचे वाटप करण्यात येते. अन्नाला कोणत्याही प्रकारचा गंध येत असल्यास ते स्वीकारले जात नाही. अन्न वाहतुकीतही योग्य काळजी घेण्यात येते,’ असे ते म्हणाले.

वाटप करणाऱ्या संस्थांनी करावयाच्या नोंदी

* अन्न दान करणाऱ्या संस्थेचे नाव आणि पत्ता

* अन्नाचे संकलन करणाऱ्या संस्थेचे नाव आणि पत्ता

* दान केलेल्याची तारीख, अन्नपदार्थाचे नाव, बॅच क्रमांक, निर्मितीची तारीख, अन्नाची कालमर्यादा, प्रमाण, तापमान, वाटप केलेल्याची तारीख आणि विभाग

मसुद्यातील ठळक सूचना

* अन्नदान करणाऱ्या व्यावसायिकांनी अन्न देताना नासणारे आणि न नासणारे असे वर्गीकरण करून पदार्थ देणे आवश्यक आहे.

*  अन्नपदार्थ सुरक्षित आणि स्वच्छ राहावेत यासाठी योग्यरीतीने वेष्टन केलेले असावेत.

* अन्नपदार्थ एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना योग्य तापमान राखले जाईल, अशी सुविधा वाहनांमध्ये उपलब्ध असावी.

* अन्नपदार्थ साठवण्याची भांडी किंवा गोदाम स्वच्छ असावेत. कमी तापमानाखाली साठवणूक करण्याचे पदार्थ शीतगृहात ठेवलेले असावेत.