टाळेबंदीची मुदत वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून टाळेबंदीबाबत सुधारित अधिसूचना जाहीर केली असून, मुंबई महानगर प्रदेश, पुणे-पिंपरी-चिंचवड, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात टाळेबंदी अंशत: शिथिल केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि ठाणे ही प्रमुख शहरे बंदच राहणार आहेत.

करोनाची साथ नियंत्रणात न आल्याने केंद्राने टाळेबंदी १७ मेपर्यंत वाढवली. रुग्णांच्या संख्येनुसार जिल्ह्य़ांची हिरव्या, नारिंगी व धोकादायक लाल या तीन विभागांत विभागणी के ली आहे.

राज्यात इतर ठिकाणी लाल विभागातही प्रतिबंधित क्षेत्र वगळल्यास खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापने सुरू करण्याची व त्यासाठी लोकांना नियमानुसार ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  नारिंगी भागात बऱ्याच गोष्टींच्या परवानगीसह जिल्हांतर्गत वाहतुकीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

चारचाकी वाहनांत चालकाव्यतिरिक्त दोनच प्रवासी प्रवास करू शकतील.  राज्यात सहा जिल्हे हिरव्या विभागात असून त्या ठिकाणी सर्व व्यवहार खुले करण्यास परवानगी दिली आहे.

परवानगी काय? सुरक्षित अंतर राखण्याच्या अटीवर उद्योग-दुकानांबरोबर कर्मचाऱ्यांच्या ३३ टक्के  उपस्थितीच्या मर्यादेचे पालन करून काम करण्याची परवानगी खासगी कार्यालयांना दिली आहे. नारिंगी भागात जिल्हांतर्गत वाहतुकीला सशर्त परवानगी देण्यात आली असून हरित क्षेत्रात सर्व प्रकारच्या उद्योग-व्यवसाय-व्यापारास आणि ५० टक्के  प्रवासी क्षमतेच्या अटीसह सार्वजनिक वाहुतकीलाही परवानगी देण्यात आली आहे.

काही अटी..

मॉलवर बंदी कायम, व्यापारी संकु लातील जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानांवरील बंदी कायम आहे. हरित, नािरगी क्षेत्रात सर्व प्रकारच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोणत्याही गल्लीत पाचपेक्षा अधिक दुकाने सुरू नसावीत अशी अट टाकण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना या मर्यादेतून वगळण्यात आले आहे.