दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा विषयातील प्रावीण्यासाठी अतिरिक्त गुण मिळतात. मात्र, यंदा मुंबई शहराबरोबरच विभागातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांच्या लाभापासून वंचित राहावे लागल्याची तक्रार शिक्षक, पालकांनी केली आहे. मुंबई उपनगरातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुणांसाठी अर्ज दिले. मात्र शाळेने ते अर्ज वेळेवर विभागीय मंडळाकडे दिले नाहीत. शाळांच्या या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो आहे. साधारण आठ शाळांबाबत पालकांनी विभागीय मंडळाकडेही तक्रार केली होती. मात्र मुदत उलटून गेल्याचे कारण देत मंडळाने प्रस्ताव स्वीकारले नाहीत.

शंभर टक्के निकालाच्या शाळाही घटल्या

शाळेतील सर्व मुले उत्तीर्ण होण्याचा म्हणजेच शंभर टक्के निकालाचा पल्ला गाठण्याचे अनेक शाळांचे उद्दिष्ट यंदा फसले आहे. मुंबई विभागात गेल्या वर्षीपेक्षा शंभर टक्के शाळांची संख्या यंदा निम्म्याने घटली आहे. विभागातील ३३१ शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागला आहे. गेल्या वर्षी ८१६ शाळा होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत शून्य टक्के मिळालेल्या शाळांची संख्याही यंदा वाढली आहे. विभागातील ५ शाळांचा निकाल गेल्या वर्षी ० टक्के लागला होता, तर यंदा ही संख्या २७ झाली आहे.

शंभर टक्के मिळालेला एकही विद्यार्थी नाही

गेली दोन वर्षे शंभर टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची राज्यभरात शेकडोच्या घरांत संख्या होती. मुंबई विभागातही गेल्या वर्षी चार विद्यार्थी १०० टक्के पटकावणारे होते. यंदा मात्र विभागातील एकाही विद्यार्थ्यांला शंभर टक्के मिळालेले नाहीत. त्याचबरोबर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे.