दहावीच्या निकालातील विद्यार्थिशत्रू म्हणून वर्षांनुवर्षे ओळखल्या जाणाऱ्या विज्ञान, गणित विषयांऐवजी यंदा भाषा विषयांनी विद्यार्थ्यांना काहीसा दगा दिला आहे. भाषा विषयांच्या घसरलेल्या निकालाची परिणती एकूण टक्केवारी घसरण्यात झाल्याचे दिसते. पाठावरील प्रश्नोत्तरांपेक्षा भाषा उपयोजनाशी संबंधित प्रश्नांनी विद्यार्थ्यांची दाणादाण उडवल्याचे निदर्शनास येते.

भाषा विषयांमध्ये गुणवाढीचे नवनवे विक्रम नोंदवले जात नसले तरी भाषेत विशेषत: प्रथम भाषेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही तुलनेने कमी असते. सर्वसाधारणपणे शाळांमध्ये दहावीसाठी गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत आणि सामाजिक शास्त्रे या विषयांमध्ये आजपर्यंत गणित, विज्ञानाचा निकाल हा भाषा विषयांपेक्षा तुलनेने कमी असतो. यंदा मात्र बरोबर उलट चित्र आहे. गणिताचा निकाल हा साधारण गेल्या वर्षीप्रमाणेच आहे. गेल्या वर्षी गणितातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८९.१३ टक्के होते. यंदाही ते तेवढेच आहे. सामान्य गणिताचा पर्याय बंद झाल्यावरही निकालात फरक पडला नाही. संस्कृत वगळता भाषा विषयांच्या निकालात मात्र मोठी घसरण झालेली दिसते.

अंतर्गत मूल्यमापन बंद झाल्याने आणि भाषेच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर झाला, असे शिक्षकांचे मत आहे. आतापर्यंत भाषेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाठावर आधारित प्रश्न, व्याकरणाचे लघुत्तरी प्रश्न अधिक असत. यंदा मात्र प्रश्नपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका देण्यात आल्या. पत्रलेखन किंवा निबंधलेखन या ठरावीक दोन प्रश्नांच्या पलीकडे जाऊन बातमी लिहिणे, जाहिरातीचा मजकूर लिहिणे, निबंध, पत्र, कथा पूर्ण करणे, उतारा आकलन, कविता रसग्रहण, त्यातील काही प्रश्नांमध्ये एखाद्या घटनेवर स्वमत लिहिणे, असे कृतिपत्रिकांचे स्वरूप होते. व्याकरणाच्या अनेक घटकांची तपासणीही या लेखन कौशल्यांवर आधारित प्रश्नांतूनच करण्यात आली. भाषेचा योग्य वापर आणि लेखन कौशल्याअभावी निकालात घट झाल्याचे मत एका शिक्षकांनी व्यक्त केले. खूप लिहिण्याची सवय विद्यार्थ्यांना गेली काही वर्षे राहिलेली नाही. या वर्षी ठरावीक वेळेत खूप लिखाण करण्यात विद्यार्थी कमी पडले, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

याबाबत डोंबिवली येथील टिळक नगर विद्यामंदिर शाळेच्या उपमुख्याध्यापिका लीना मॅथ्यू यांनी सांगितले, ‘‘भाषा विषयांमध्ये विद्यार्थ्यांना लिखाणाचा भाग खूप होता. लिखाणाची सवय विद्यार्थ्यांना असावी लागते, अचानक लिहिता येत नाही. आठवीपर्यंत लघुत्तरी प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका सोडवण्याची सवय झाल्यानंतर एकदम लेखन कौशल्यावर आधारित प्रश्न सोडवण्याची वेळ यंदा विद्यार्थ्यांवर आली. अनेकांची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवूनही झाली नाही. शिक्षकही काहीसे गोंधळात होते. आता विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढील वर्षांसाठी ते शक्य आहे. मात्र यंदा तयारी करून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.’’

मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रेडीज म्हणाले, ‘‘एखादा बदल हा पहिलीपासून होणे अपेक्षित आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आठवीपर्यंत ज्या प्रकारची प्रश्नपत्रिका सोडवली होती, त्यापेक्षा वेगळ्याच परीक्षेला त्यांना सामोरे जावे लागले, ते विद्यार्थ्यांना जड गेले आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण बंद केल्याचा फटकाही बसला आहे.’’

भाषांची घसरगुंडी

मराठी प्रथम भाषा विषयाचा निकाल ९०.९६ टक्क्यांवरून ७८.४२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मराठी द्वितीय भाषा विषयाचा निकाल ९३.०६ टक्क्यांवरून ८४.५५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. इंग्रजी प्रथम भाषेचा निकाल ९७.८६ टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर, तर द्वितीय किंवा तृतीय भाषेचा म्हणजेच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा निकाल ९०.१२ टक्क्यांवरून ८०.२४ टक्क्यांवर आला आहे. हिंदीचीही परिस्थिती अशीच आहे. द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणून हिंदी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ९२.४४ टक्क्यांवरून ८४.१७ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.