मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात फरक पडू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पाच राज्यांच्या निकालांनी काँग्रेस आणि शिवसेनेची कॉलर ताठ झाली असून, पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीकडून काँग्रेस हा भाजपला सक्षम पर्याय असल्याचे कौतुक करण्यात आले.

पाच राज्यांच्या निकालांचा राज्यावर नक्कीच राजकीय परिणाम होणार आहे. राज्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला. याचा विदर्भात परिणाम होऊ शकतो. विदर्भ हा पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसचा गड होता. अगदी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये विदर्भात इंदिरा काँग्रेसला यश मिळाले होते. राज्यात काँग्रेसला सत्ता मिळण्यात नेहमीच विदर्भाचा हातभार लागतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून चित्र बदलले. लोकसभेच्या सर्व दहाही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ६२ पैकी ४४ जागा भाजपने जिंकल्या होत्या. १९७७ मध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर प्रथमच विदर्भात भाजपला घवघवीत यश मिळाले होते.

मध्यप्रदेशची सीमा नागपूर तसेच जळगाव-धुळे-नंदुरबार या जिल्ह्यांना लागून आहे. छत्तीसगडची सीमा गोंदिया-भंडारा जिल्ह्यांलगत आहे. विदर्भ आणि खान्देशात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निकालांचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. कारण या भागांतील लोकांचे शेजारच्या प्रदेशांमध्ये ये-जा सुरू असते. तसेच व्यापारी किंवा रोजगाराचे संबंध आहेत. विदर्भात आधीच भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. गेल्या मे महिन्यात झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचा पराभव केला होता. वास्तविक भाजपसाठी ही पोटनिवडणूक एकतर्फी होती. पण शेतकरी वर्गाची नाराजी भाजपला भोवली. शेतकरी वर्गाच्या नाराजीमुळेच पराभव झाल्याची कबुली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. याआधी भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येही भाजपचा पराभव झाला होता.

काँग्रेसमध्ये उत्साह

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपवर ३-० अशी मात केल्याने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निवडणुकांचे वारे वाहू लागल्यापासून राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे जाहीर केले असले तरी काँग्रेसबद्दल राष्ट्रवादीकडून उलटसुलट विधाने करण्यात आली होती. काँग्रेस किंवा राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य करण्यास राष्ट्रवादीची तयारी नव्हती. पण पाच राज्यांच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला काँग्रेसचाच पर्याय असल्याचे सांगत काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असा संदेश दिला. पवारांच्या या विधानाकडे काँग्रेसचे नेते लक्ष वेधत आहेत. दुसरीकडे, भाजपच्या पराभवामुळे शिवसेनेचे नेतेही भाजपची कशी जिरली या आनंदात आहेत. युती करायची असल्यास आमच्याकडे या, असाच शिवसेनेचा आता पवित्रा राहणार आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विजयाने विदर्भ आणि खान्देशात नक्कीच परिणाम होणार आहेत. विदर्भात आधीच भाजपच्या विरोधात नाराजी आहे. हे भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले. भाजपला पाठिंबा दिल्याचा शेतकरी, कामगार अशा सर्वच वर्गाना पश्चाताप झाला आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत विदर्भ पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी उभा राहील.

– माणिकराव ठाकरे, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष