मुंबईतील विभागीय अंतिम फेरी आज पाल्र्यात; मुंबईच्या नाटय़वर्तुळातील ‘दादा’ महाविद्यालयांमध्ये चुरस
मुंबईच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाना खूप मोठी परंपरा असून या एकांकिका स्पर्धानी मराठीच नाही, तर हिंदूी मनोरंजनक्षेत्रालाही एकापेक्षा एक सर्जनशील कलाकार दिले आहेत. शनिवारी याच परंपरेतील पुढला अध्याय विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात साकारला जाणार आहे. निमित्त आहे सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या एकांकिका स्पर्धेच्या मुंबई विभागाच्या अंतिम फेरीचे! प्राथमिक फेरीतील १७ एकांकिकांमधून अंतिम फेरीत आलेल्या पाच महाविद्यालयांचे कलाकार शनिवारी आपल्या एकांकिका सादर करतील आणि मग पारितोषिक वितरणाच्या वेळी घुमणाऱ्या ‘येऊन येऊन येणार कोण’ या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
लोकसत्ता लोकांकिका या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या मुंबई विभागातील प्राथमिक फेरीतून पाच महाविद्यालयांची निवड झाली. यात म. ल. डहाणूकर महाविद्यालय (एक्स-प्रीमेंट), रूईया महाविद्यालय (सुशेगात), साठय़े महाविद्यालय (अर्बन), कीर्ती महाविद्यालय (लछमी) आणि के. जे. सोमय्या महाविद्यालय (शिकस्त ए ईष्क) यांचा समावेश आहे. मुंबईच्या एकांकिका वर्तुळात दादा मानल्या जाणाऱ्या डहाणूकर, रूईया, साठय़े या महाविद्यालयांच्या सहभागामुळे ही अंतिम फेरी अधिकच चुरशीची होणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी टॅलेण्ट पार्टनर म्हणून आयरिस प्रॉडक्शनने काम पाहिले. अस्तित्त्व या संस्थेच्या मदतीने राज्यभरात होणाऱ्या या स्पर्धेला ९३.५ रेड एफएम हे रेडिओ पार्टनर म्हणून आणि झी मराठी नक्षत्र हे टेलिव्हिजन पार्टनर म्हणून लाभले आहेत. तर नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल यांनी काम बघितले आहे. मुंबईतील पाच एकांकिकांमधून आता एक एकांकिका सवरेत्कृष्ट म्हणून निवडली जाईल. ही एकांकिका १७ ऑक्टोबर रोजी मुंबईतच होणाऱ्या महाअंतिम फेरीत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.