अंतिम वर्ष वगळता प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षांचे निकाल सरासरी मूल्यांकनानुसार जाहीर करण्याच्या निर्णयाला अडीच महिने होऊन गेले तरीही अद्याप बहुतेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये हे निकालही रखडलेच आहेत.

राज्यातील परीक्षांचा पेच हा अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत आहे. प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचे निकाल आधीच्या वर्षांतील किंवा सत्रातील गुण आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण यांच्या सरासरीनुसार निकाल जाहीर करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने २९ एप्रिलला दिलेल्या सूचनांनुसार प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या निकालाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यानेही त्या स्वीकारल्या आहेत. मात्र आयोगाच्या सूचनांना अडीच महिने उलटले तरीही सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये प्रथम आणि द्वितीय वर्षांचे निकाल जाहीर करू शकलेली नसल्याचे दिसत आहे. हे निकाल जाहीर करण्यासाठी १५ जुलैची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता या मुदतीत निकाल जाहीर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे प्रथम आणि द्वितीय वर्षांचे निकाल महाविद्यालयाच्या पातळीवर जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, बहुतेक महाविद्यालयांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निकाल हे विद्यापीठाच्या पातळीवर सुरू असून अद्याप सर्व विद्याशाखांचे निकाल जाहीर झालेले नाहीत.

वेळेवर निकालासाठी सरासरीचा उपायही गैरलागू?

अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करून सरासरीनुसार निकाल जाहीर करावा ही मागणी करत असताना त्यामुळे निकाल लवकर जाहीर होऊन शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र, कोणताही वाद नसताना प्रथम आणि द्वितीय वर्षांचे निकालही अद्याप सरासरीनुसार जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे अंतिम वर्षांचे निकाल सरासरीनुसार जाहीर करण्याच्या पर्यायाने शैक्षणिक वर्ष वेळेवर कसे सुरू होणार? विद्यार्थ्यांचे तपशील महाविद्यालयात असतील तर विलगीकरण कक्ष असलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे निकाल कसे जाहीर होणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाविद्यालयांसमोर अडचणी

महाविद्यालयांमध्ये सध्या मर्यादित कर्मचारी वर्ग आहे. तेवढय़ातच सर्व काम महाविद्यालयाला करायचे आहे. अनेक प्राध्यापक महाविद्यालयांत येऊ शकत नाहीत. त्यामुळे दोन वर्षांचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे निकालाचे तपशील काढणे आणि त्यांच्या सरासरीनुसार अंतिम निकाल जाहीर करणे या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे एका प्राचार्यानी सांगितले. त्याचप्रमाणे काही महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष आहेत. विद्यार्थ्यांचे आणि निकालाचे तपशील हे महाविद्यालयांत असल्यामुळेही निकलाचे काम रखडले आहे.