मुंबई विद्यापीठाच्या निकाल विलंबाचा फटका; न्यायालयात दाद मागणार

मुंबई विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांचे निकाल उशिरा लावल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी आपली शाखा बदलायची होती त्यांची संधी हुकली आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये कमालीची संतप्त भावना निर्माण झाली आहे. एकीकडे शिक्षणमंत्री अभियांत्रिकी शिक्षणात संशोधनाला वाव देण्याच्या बाता मारत आहेत. मात्र विद्यापीठाच्या चुकीची शिक्षा भोगणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शाखा बदलण्यासाठीचा साधा शासन आदेशही काढण्यास तयार नाहीत. त्यामुळे संतप्त पालक आता उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

एकीकडे मुंबई विद्यापीठाने पहिल्या वर्षीचे अभियांत्रिकीचे निकाल उशिरा लावले तर दुसरीकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अंतर्गत शाखा बदलाला मान्यता देण्यासाठीचा शासन आदेशही काढला नाही. परिणामी उत्तम गुण मिळवून दुसऱ्या वर्षीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शाखा बदलून हव्या असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेतला तरी पहिल्या वर्षांसाठी सर्व विषय समान असतात. परिणामी एखाद्या विद्यार्थ्यांला दुसऱ्या वर्षी मेकॅनिकल ऐवजी इलेक्ट्रॉनिक अथवा सिव्हिल अथवा आयटी शाखेत प्रवेश हवा असेल तर गुणांच्या आधारे महाविद्यालयाअंतर्गत त्याला शाखा बदल करता येतो. त्याचप्रमाणे पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षांत प्रवेश दिला जातो. यंदा अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांचा निकाल हा जुलैच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवडय़ात लागणे अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाने घातलेल्या गोंधळामुळे ऑगस्टअखेरीस निकाल जाहीर करण्यात आले. पदवीचे पहिल्या वर्षीचे निकाल उशिरा लागले असतानाच पदविकाचे निकाल अगोदर जाहीर झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन टाकल्यामुळे जवळपास सर्व जागा भरण्यात आल्या. या साऱ्याचा फटका उशिरा निकाल लागलेल्या पहिल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना बसला. यात ज्या विद्यार्थ्यांना आपल्या शाखा बदलून हव्या होत्या अशा विद्यार्थ्यांसाठी जागाच शिल्लक राहिल्या नाहीत.

शाखा बदलण्याचा मार्गच बंद

पहिल्या वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागा भरू देण्याबाबत शासनाच्याच एका आदेशामुळे अडथळा निर्माण झाला असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी तरी अभियांत्रिकी पदवीच्या पहिल्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने शासन आदेश काढायला हवा होता. मात्र असा आदेश न काढल्यामुळे शाखा बदलण्याचा या विद्यार्थ्यांचा मार्गच बंद झाला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रवेश हे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्यामुळे आता न्यायालयाचाच दरवाजा ठोठावण्याशिवाय या पालकांकडे पर्याय राहिलेला नाही.

राज्यात जवळपास ३५० अभियांत्रिकी महाविद्यालये असून प्रत्येक महाविद्यालयात किमान पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना अंतर्गत शाखा बदल हवा असतो. याच विचार करता पाच हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.

– वैभव नरवडे, प्राध्यापक