शिथिलीकरणानंतरदेखील ६४ टक्के व्यापार कमी झाल्याचा संघटनेचा दावा

मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणानंतरही किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वृद्धी झालेली नाही. किरकोळ दुकानदारांच्या देशव्यापी संघटनेने १ ते १५ जून या काळात केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६४ टक्के  व्यापार कमी झाल्याचे दिसून आले आहे. पाचपैकी चार भारतीय ग्राहकांनी खरेदीवरील खर्च कमी के ल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर अनेक दुकानदारांना व्यापारात वाढ होण्याची अपेक्षा होती. पण गेल्या पंधरा ते वीस दिवसांत सर्वत्रच खडखडाट दिसत असून कपडे, चप्पल यासारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू, दागिने, घडय़ाळ तसेच चैनीच्या वस्तूंच्या व्यापाराला यामध्ये सर्वाधिक फटका बसल्याचे संघटनेच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. कपडय़ांच्या व्यापारास ६९ टक्के , तर दागिने, घडय़ाळ व वैयक्तिक वापराच्या वस्तूंच्या व्यापारास ६५ टक्के  फटका बसला आहे.

टाळेबंदी जाहीर झालेल्या पहिल्या महिन्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये झुंबड उडाली होती. त्यावेळी धान्य वगैरे जीवनावश्यक जिन्नसांबरोबरच केकचे साहित्य वगैरे जिन्नसांची प्रचंड विक्री झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांत केवळ धान्य, तेल, दूध अशा अगदीच जीवनावश्यक वस्तूंना मागणी असल्याचे संघटनेचे सदस्य अंधेरी येथील दुकानदार विपुल शहा यांनी सांगितले. ग्राहक फक्त अगदी गरजेच्या वस्तू सध्या खरेदी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात पुरवठा करणाऱ्या अनेक दुकानदारांना मोठा फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या सर्व कॉर्पोरेट क्षेत्र पूर्णपणे कार्यरत नसल्याने त्यावर अवलंबून असलेले झेरॉक्स, स्टेशनरी, प्रिटिंगची दुकाने पूर्ण सुरू झालेली नाहीत. या दुकानदारांमध्ये कच्छ येथील व्यापाऱ्यांचे प्राबल्य असून, बहुतांशपणे ही दुकाने भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर अशी दुकाने बंद करून परत जायचा मार्ग पत्करल्याचे संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांकडून व्यवसाय बदलण्याची इच्छा

दुसरीकडे अनेक व्यापाऱ्यांनी व्यवसाय बदलण्याची इच्छा व्यक्त केल्याचे संघटनेचे सदस्य दादर येथील सुपर मार्केटचे चेतन संगोई यांनी सांगितले. विशेषत: फर्निचर, तयार कपडय़ांचे दुकानदार सुपर मार्केटच्या व्यवसायात यायचा विचार करत असल्याचे ते म्हणाले. सध्या ग्राहकांचा भर जरी मोजक्याच वस्तूंवर असला तरी पुढील महिन्यानंतर इतर व्यापारालादेखील चालना मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. किरकोळ दुकाने उघडली जात असली तरी शिथिलीकरणातील बंधने सर्व राज्यांत एकसारखी असण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे.