राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून जाहीर केले. खडसे यांचा केवळ राजीनामा न घेता त्यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी सातत्याने विरोधकांनी लावून धरली होती. खडसे यांनी स्वत:देखील राजीनामा सादर करताना चौकशीची मागणी केली होती.  या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी खडसेंच्या चौकशीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, खडसे यांनी दिलेला राजीनामा स्विकारण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. हा राजीनामा राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध आरोपांची राळ उठली होती. या पार्श्वभूमीवर खडसेंचा राजीनामा घेण्यासाठी भाजपवरील दबाव वाढत होता. गेल्या दोन दिवसांत यासंदर्भातील घडामोडींनी वेग घेतला होता. अखेर आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाची प्रतिमा अधिक मलिन होऊ नये, यासाठी राजीनामा द्यावा, असे खडसेंना दुरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर एकनाथ खडसे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत आपण मंत्रिपद स्वेच्छेने सोडत असल्याचे सांगितले. पक्ष माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. मात्र, माझ्यावरील आरोपांचा सोक्षमोक्ष लागावा, यासाठी मंत्रिपद सोडत असल्याचे खडसेंनी यावेळी स्पष्ट केले.