27 September 2020

News Flash

निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक

तीन अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटणखान्यात पाठवल्याचा आरोप

(संग्रहित छायाचित्र)

तीन अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटणखान्यात पाठवल्याचा आरोप

वेश्यालयातून सुटका केलेल्या तीन अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटणखान्यात पोहोचवल्याच्या आरोपात नागपाडा पोलीस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलंदर शेख यांना शनिवारी अटक करण्यात आली. रेस्क्यू फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने १५ वर्षांपुर्वी हा प्रकार उघडकीस आणला होता. तीन वर्षांपुर्वी सत्र न्यायालयाने या प्रकरणाच्या पुनर्तपासाचे आदेश दिले होते.

२००४च्या सुरूवातीला पश्चिम बंगाल आणि नेपाळमधून तीन अल्पवयीन मुलींची कामाठीपुरा येथील बंगला क्रमांक तीन येथील कुंटणखान्यात विक्री झाल्याची माहिती रेस्क्यू फाऊंडेशनचे प्रमुख दिवंगत बाळकृष्ण आचार्य, अ‍ॅड. हरीश भंडारे यांना मिळाली. त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ निरीक्षक शेख यांना ही माहिती दिली. पोलीस पथक, फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी कुंटणखान्यावर धाड घालून तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने बालकल्याण समितीसमोर उभे करून समितीच्या आदेशानुसार त्यांना सुरक्षित अधिवासाची व्यवस्था करणे, वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक होते.

अ‍ॅड. भंडारे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांनी या मुलींबाबत बालकल्याण समितीकडे चौकशी केली. तेव्हा नागपाडा पोलिसांनी त्या मुलींना समितीसमोर आणलेच नाही, अशी माहिती मिळाली. आणखी चौकशी केली तेव्हा मुलींना त्यांचे पालक घेऊन गेले, अशी नोंद अभिलेखावर करत प्रत्यक्षात शेख यांनी त्यांना त्याच कुंटणखान्यात पाठवल्याची माहिती पुढे आली. फाऊंडेशनने समाजसेवा शाखेच्या मदतीने या कुंटणखान्यावर पुन्हा धाड घातली. तेव्हा त्या मुली तेथे सापडल्या. या प्रकारानंतर आम्ही तत्कालिन पोलीस आयुक्तांकडे वरिष्ठ निरीक्षक शेख यांच्याविरोधात लेखी तक्रार केली. त्यावरून शेख यांची विभागीय चौकशीही झाली होती.

या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला खरा मात्र पुरावे मिळत नसल्याने प्रकरण भिजत पडले. २०१६मध्ये पुरावे नसल्याने ‘ए समरी’ अहवाल सादर करत सत्र न्यायालयाकडे प्रकरण बंद करण्याबाबत परवानगी मागण्यात आली. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अद्यापही तपासाला वाव असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच परिमंडळ तीनचे उपायुक्त अभिनाश कुमार यांना नव्याने तपास करण्याचे आदेश दिले.

अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे आणि पथकाने तपासासाठी तीन मुलींचा शोध सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर एका मुलीचा पश्चिम बंगालमध्ये शोध घेण्यात पथकाला यश आले. या मुलीचा जबाब, २००४मध्ये संबंधीत कुंटणखान्यावर दोन वेळा पडलेल्या धाडीत सहभागी पोलीस आणि रेस्क्यु फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून शनिवारी रात्री पथकाने शेख आणि रविंद्र पांडे उर्फ बिब्बा या व्यक्तीला अटक केली. पांडे हा तेव्हा एका राजकीय पक्षाचा तालुका प्रमुख होता. या तीन मुलींना पुन्हा कुंटणखान्यात सोडण्यासाठी शेख यांच्याकडे त्यानेच मध्यस्थी केली होती, अशी माहिती पथकाला मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2019 1:15 am

Web Title: retired senior police inspector arrested mpg 94
Next Stories
1 वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांत संगणक प्रणालीचा बोजवारा!
2 मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून कर्णबधिर मुलांना श्रवणशक्ती
3 अभियांत्रिकीसाठी १० वर्षांत प्रथमच कमी अर्ज
Just Now!
X