युद्धसमाप्तीच्या वेळेस किंवा शहिदांना सलामी देताना वाजविली जाणारी बिगुलाची धून, तिचे वातावरणात भरून राहिलेले सूर.. युद्धनौकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फडफडणारी निवृत्तीची विशेष पताका, युद्धनौकेची धुरा सांभाळलेल्या आजवरच्या १९ कमांडिंग अधिकाऱ्यांची खास उपस्थिती अशा वातावरणात; तब्बल ३२ वर्षे भारतीय नौदलाची अविरत सेवा बजावलेल्या ‘आयएनएस गोदावरी’ या भारतीय बनावटीच्या सर्वात पहिल्या युद्धनौकेला अरबी समुद्रामध्ये अस्ताला जाणारा सूर्याच्या साक्षीने बुधवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला.
सायंकाळच्या सूर्यकिरणांबरोबरच नौदल गोदीतील वातावरण अधिकाधिक भावपूर्ण होत होते. ‘आयएनएस गोदावरी’वर सेवा बजावलेल्या सर्व अधिकाऱ्यांना या सोहळ्यासाठी सहकुटुंब पाचारण करण्यात आले होते. या सोहळ्याला स्नेहसंमेलनाचेच रूप त्यामुळे लाभले होते. ‘आयएनएस गोदावरी’वरील आठवणींना भरते आलेले असतानाच निवृत्ती सोहळ्यास सुरुवात झाली.. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला साक्षी ठेवून बिगूल वाजण्यास सुरुवात झाली आणि गोदावरीवर सेवा बजावलेल्या अनेक अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले. राष्ट्रध्वज असलेला भारतीय नौदलाचा ध्वज समारंभपूर्वक उतरवून युद्धनौकेचे कमांिडग अधिकारी कमांडर विशाल रावल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर निवृत्तीची विशेष पताकाही समारंभपूर्वक उतरवण्यात आली. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कार्मिक अधिकारी व्हाइस अ‍ॅडमिरल हरी कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यांच्याच हस्ते ‘आयएनएस गोदावरी’च्या निवृत्तीच्या निमित्ताने एका विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात आले.
‘जागरूक, सजग व निर्भय’ असे घोषवाक्य असलेली ‘आयएनएस गोदावरी’ ही पूर्णपणे भारतीय बनावटीची पहिलीच युद्धनौका होती. १० डिसेंबर १९८३ रोजी ती भारतीय नौदलात दाखल झाली. १९८६ साली स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त अमेरिकेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्येही ती सहभागी झाली होती. १९८८ साली ऑस्ट्रेलिअन नौदलाच्या द्विशताब्दी सोहळ्यातील सहभागानंतर तर संपूर्ण जगभरात तिची चर्चा झाली. मालदीवच्या ‘ऑपरेशन कॅक्टस’सह नंतरच्या अनेक प्रमुख मोहिमांमध्येही ती सहभागी झाली
होती.
या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना व्हाइस अ‍ॅडमिरल हरी कुमार म्हणाले की, या युद्धनौकेचे काय करायचे या संदर्भात कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. तिच्यावर संग्रहालय उभारण्याचा एक पर्याय असतो, मात्र त्यासाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

आयएनएस गोदावरी ते स्कुटी!
कॅप्टन एनएस मोहन राम हे आयएनएस गोदावरीचे प्रमुख डिझाइनकर्ते! तेही तिच्या निवृत्ती सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘केवळ पूर्णपणे भारतीय बनावटीची म्हणून नव्हे तर इतरही अनेक अंगांनी ती जगातील एकमेवाद्वितीय अशी युद्धनौका होती. दोन सीकिंग हेलिकॉप्टर्स एकाच वेळी वाहून नेऊ शकेल, अशी ती जगातील पहिली युद्धनौका ठरली होती. १९७२ साली तिच्या डिझाइनला सुरुवात झाली. १९७४ साली डिझाइनचे काम माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. त्या पाठोपाठ मी माझगाव गोदीत आलो आणि तिची बांधणीही पूर्ण होऊन १९८३ साली ती नौदलात दाखलही झाली. तिच्या अनेक वैशिष्टय़ांमुळे जगभरातील प्रगत देशांच्या नौदलांचेही लक्ष तिच्याकडे वेधले गेले. त्यापूर्वी भारतीय नौदलात दाखल झालेल्या युद्धनौकांचा वेग फारसा नव्हता. त्या तुलनेत वजन वाढल्यानंतर तिचा वेग आणखी कमी होणे अपेक्षित होते, पण हिचा वेग मात्र वाढला होता. ते कसे काय साध्य केले याचे सर्वानाच कोडे पडले होते.’’
शीतयुद्ध ऐन टिपेला असताना तिची निर्मिती झाली. त्या वेळेस युद्धनौकेच्या खालच्या अमेरिकन तर वरच्या बाजूस रशियन शस्त्रास्त्रे मिरवणारी ती जगातील एकमेव अशी युद्धनौका होती. यामुळे अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश चकित झाले होते.
-कॅप्टन एनएस मोहन राम