तीन महिन्यांत १,६८१ तक्रारी; प्रवाशांना मनस्ताप

मुंबई : विमानाच्या फेऱ्यांची घटलेली संख्या, करोनाची लागण झाल्यामुळे प्रवाशांना आयत्या वेळी प्रवास रद्द करण्याची येणारी वेळ, निर्बंधांमुळे नियोजनात होणारे बदल अशा विविध कारणांमुळे प्रवासी व विमान कंपन्यांमध्ये वारंवार संघर्षाचे प्रसंग उद्भवत आहेत. देशात या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत अशा विविध प्रकारच्या १,६८१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या (डीजीसीए) माहितीनुसार यातील सर्वाधिक तक्रारी तिकिटांच्या परताव्याबाबत (रिफं ड) आहेत.

करोनामुळे मार्च २०२० पासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांनी तिकिटांच्या परताव्याची मागणी करताच विमान कंपन्यांनी बिकट आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करत परतावा देण्यास असमर्थता दर्शवली. परताव्याऐवजी प्रवाशांनी त्यांच्या नजीकच्या भविष्यातील प्रवासासाठी हे पैसे वापरावे आणि त्यासाठी प्रवाशांना या विमान कंपन्यांकडून क्रेडिट कूपन्स देऊ करण्यात आली. मात्र प्रवाशांनी केलेला विरोध आणि न्यायालयातही याबाबत प्रकरण गेल्यानंतर विमान कंपन्यांना परतावा देणे भाग पडले. परंतु आताही परतावा मिळण्यात प्रवाशांना अडचणीच येत आहेत.

जानेवारी २०२१ मध्ये विविध ४१२ तक्रारी आल्या होत्या. यामध्ये ४१ टक्के तक्रारी परताव्याबाबत आहेत. फेब्रुवारीतील ४७८ तक्रारींमध्ये ५४ टक्के तर मार्चमध्ये प्रवाशांशी संबंधित ७९१ तक्रारींकपैकी ६५.७० टक्के  तक्रारी तिकीट परताव्याबाबतच्या आहेत. विमान उड्डाणास किंवा पोहोचण्यास उशीर होणे, प्रवासात येणाऱ्या समस्यांबाबतही तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. जानेवारीत अशा प्रकारच्या १४ टक्के, फेब्रुवारीत १३.२० टक्के आणि मार्च महिन्यात ३.७० टक्के तक्रारी आल्या आहे. प्रवाशांनी ग्राहक सेवांविरोधातही तक्रारी के ल्या आहेत. प्रवाशांना वेळेत व व्यवस्थित माहिती उपलब्ध होत नसल्याने त्याविरोधात तीन महिन्यांत २८३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात जानेवारीत ९०, फे ब्रुवारीमध्ये ४३, तर मार्च महिन्यात १५० तक्रारी आहेत. कर्मचाऱ्यांची वर्तवणूक, सामानाची तपासणी किं वा सामान गहाळ होण्याच्या तक्रारीही आहेत.

अडचणी कोणत्या?

परतावा वेळेत न मिळणे, तिकिटे दलालांमार्फतकाढली असतील तर त्याचा परतावा विमान कं पन्यांनी दलालांना देऊनही दलालांकडून तो प्रवाशांना न मिळणे, अनेक कागदोपत्री समस्या निर्माण होणे, यामुळे तिकिटाच्या परताव्याविषयीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

विमान कंपन्यांकडून दखल…

देशांतर्गत विमान प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न विमान कंपन्यांकडून करण्यात आला आहे. जानेवारी ४१२ तक्रारी असताना त्यातील ९० टक्के तक्रारी सोडवण्यात यश आले आहे. तर फे ब्रुवारीत ४७८ पैकी ४५१ आणि ७९१ पैकी ७५४ तक्रारींची दखल घेण्यात आली आहे.