‘लोकसत्ता’ वर्धापन दिनानिमित्ताने मुंबईच्या सकारात्मक बदलांचा आढावा

मुंबई : नव्वदीच्या दशकापासून मुंबई आणि उपनगरे दर पाच वर्षांनी कात टाकत नव्या रूपडय़ानिशी समोर येत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या ओझ्याचा सामना करीत ही महामुंबई अधिक आकर्षक आणि जगण्यास पूर्वीपेक्षा सुसहय़ करण्यासाठी सर्वच पातळींवर यंत्रणा कार्यरत आहेत. त्यामुळे शहरातील आमूलाग्र बदलांमुळे अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत. आपल्या भवतालातील या सकारात्मक बदलांचा वेध घेण्याची संधी ‘लोकसत्ता’ वर्धापन दिनानिमित्ताने वाचकांना मिळणार आहे.

विविध समस्यांची उकल करण्यासोबत समाजात घडणाऱ्या, घडू पाहणाऱ्या सकारात्मक बदलांना ‘लोकसत्ता’ने नेहमीच पाठिंबा दिला. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आशयाचे विषय घेऊन ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित होणारे विविध उपक्रम या भूमिकेचेच प्रतिबिंब आहे. १४ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चा ७१वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने प्रकाशित होणाऱ्या वर्धापन दिन विशेष पुरवणीत मुंबई आणि परिसरात घडत असलेल्या विविध सकारात्मक बदलांचा वेध घेतला जाणार आहे.

यात विविध ज्येष्ठ सनदी अधिकारी तर लिहिणार आहेतच, परंतु वाचकांनाही या पुरवणीत व्यक्त होण्याची संधी आम्ही देणार आहोत. कारण जाणकार, सजग वाचक हेही या बदलत्या इतिहासाचे महत्त्वाचे साक्षीदार असतात.

सहभागासाठी..

आपल्या आसपास घडत असलेल्या, पायाभूत सुविधा, शिक्षण-रुग्णसेवा, वाहतूक अशा विविध क्षेत्रांमधील सकारात्मक बदलांविषयी अभिप्राय वाचकांनी ‘लोकसत्ता’ला कळवायचे आहेत. यासाठी १०० ते १५० अशी शब्दमर्यादा आहे. हे अभिप्राय शुक्रवार, १८ जानेवारीपर्यंत loksatta.abhipray@gmail.com या मेल आयडीवर पाठवणे अपेक्षित आहे. यांतील निवडक अभिप्रायांना ‘लोकसत्ता’ वर्धापन दिन पुरवणीत प्रसिद्धी मिळेल.