|| संदीप आचार्य

मुंबर्ई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा जास्त परिणाम लहान मुलांवर होणार हे तज्ज्ञांचे म्हणणे लक्षात घेऊन ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक्स’ (आयएपी) या संघटनेने करोनाबाधित लहान मुलांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

केंद्र सरकारने यापूर्वी करोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून ती करण्यात आयएपीची मोठी भूमिका होती. महाराष्ट्रातही सरकारने लहान मुलांवरील उपचाराबाबत दिशा निश्चित करण्यासाठी १४ तज्ज्ञांचे कृती दल स्थापन केले आहे.

ऑनलाइन बैठका तसेच वेगवेगळ्या औषधांचे परिणाम याची सातत्याने माहिती दिली जाते, असे माहीम येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद पणशीकर यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात ‘आयएपी’ सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून यात करोनाबाधित मुलांचे सौम्य, मध्यम व तीव्र अशा तीन गटात वर्गवारी केली आहे.

ताप, सर्दी, खोकला, उलट्या जुलाब, अंगावर चट्टे उठणे, ताप नाही पण अन्य लक्षणे दिसल्यास दवाखान्यात तसेच बाह्यरुग्ण विभागात पॅरासिटेमॉल देऊन उपचार करावे मात्र प्रतिजैविके देऊ नयेत, असे ‘आयएपी’च्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ज्या मुलांना दमा, मधुमेह आदी त्रास असल्यास त्यांच्या चाचण्या व औषधोपचार यांचे प्रमाणही निश्चित करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णालाच रेमडेसिवीर, स्टिरॉइड दिले जावे अन्य रुग्णांना म्हणजे दवाखान्यात तसेच बाह््यरुग्ण विभागात उपचार घेणाऱ्या लहान मुलांना ते दिले जाऊ नये असे ‘आयएपी’ने स्पष्ट केले आहे.

रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या वजनानुसार म्हणजेच पाच मिलिग्रॅम प्रती किलो हा रेमडेसिवीरचा डोस सांगितला आहे. साडेतीन किलो ते ४० किलो वजनी गटातील मुलांसाठी रेमडेसिवीरचे हे प्रमाण आहे. स्टिरॉईड व हिपॅरीनच्या वापराचे प्रमाणही अशाच प्रकारे निर्धारित करण्यात आल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले.

हृदयाची नियमित तपासणी आवश्यक…

लहान मुलांची मानसिकता या काळात जपणं हे एक आव्हान आहे. करोनापश्चात मुलांमध्ये होणाऱ्या बदलांकडे पालकांनी बारकाईने पाहाणे गरजेचे असल्याचे ठाण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले. लहान मुलांमधील करोना बरा झाल्यावर त्यांच्या हृदयाची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘आयएपी’ने करोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी २६ डॉक्टरांची देशव्यापी कृती समिती आहे.

मेअखेरपर्यंत लहान मुलांमधील करोनामध्ये वाढ झालेली आढळून आलेली नाही. मात्र आरोग्य विभागाने आपल्या सर्व रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ नियुक्तीपासून राखीव खाटा व औषधांची तयारी करून ठेवली आहे. – डॉ. प्रदीप व्यास, अतिरिक्त मुख्य  सचिव, आरोग्य विभाग