एशियाटीक सोसायटीला एकेकाळी वैभव प्राप्त होते. आज  मात्र हा पुस्तकांचा अनमोल खजिना दुलक्र्षित होताना दिसत आहे. अशा स्थितीत हा खजिना जतन करण्यासाठी एशियाटीक ग्रंथालयाचे पुनरुज्जीवन करण्याची गरज असून त्यासाठीचा आरखडा तयार करण्याची सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरूवारी केली.

एशियाटीक सोसायटी ऑफ मुंबईचा २१६ वा वर्धापन दिन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी व्हाईस अ‍ॅडमीरल अजित कुमार, सोसायटीचे विश्वस्त अनिल काकोडकर, अध्यक्ष प्रो. विस्पी बालपोरीया आणि सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज,संत रामदास स्वामी अशा थोर पुरुषांची भूमी आहे. या भूमीत एशियाटीक ग्रंथालय असून त्यात ऐतिहासिक पुस्तकांचा आणि साहित्याचा अनमोल ठेवा जतन केला जात आहे. ही अभिमानाची बाब आहे. अशा अनमोल ऐतिहासिक खजिन्याचे जतन करणे ही राज्यशासनाची जबाबदारी आहे. हे ग्रंथालय दुलक्र्षित किंवा नष्ट न होऊ देता, त्याचे पुनरुज्जीवन करण्याची गरज असून तसा आराखडा तयार करावा. त्यासाठी केंद्र आणि राज्यशासन तसेच राज्यपाल निधीतून आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या ग्रंथालयामध्ये एक लाखापेक्षा जास्त पुस्तके आहेत. त्यापैकी १५ हजार दुर्मिळ आणि मौल्यवान  पुस्तके असून प्राचीन, आधुनिक भारतीय आणि युरोपीयन भाषांमधील विविध पुस्तकांचा समावेश आहे. तीन हजारहून अधिक मनुस्मृतींचा ठेवा आहे. सोसायटीकडे १२ हजारहून अधिक नाणे संकलित केले आहे. अशा ऐतिहासिक ठेवा असलेली संस्था संपूर्ण जगातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली पाहिजे. या संस्थेला पुन्हा पौराणिक महत्व प्राप्त होईल आणि त्यास गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.एशियाटीक सोसायटीला डिजीटायझेशन आणि जुन्या दस्तावेजांचे जतन करण्यासाठी यापूर्वीच १५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. या व्यतीरिक्त अधिकच्या निधीची आवश्यकता असल्यास त्याचीही उपलब्धता करुन देण्याचे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले.

यावेळी राज्यपालांनी सोसायटीच्या ग्रंथांची पाहणी केली. तसेच संविधान दिन आणि २६/११ दहशतवादी हल्लय़ातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.