चर्नीरोडमधील डॉक्टरच्या क्लिनिकमधून रिव्हॉल्व्हर आणि रोकड चोरणाऱ्या नोकरासह दोघांना व्ही. पी. मार्ग पोलिसांनी अटक केली. डॉ. गुप्ता यांचे चर्नीरोड रेल्वे स्थानकाजवळ प्लास्टिक सर्जरी सेंटर हे क्लिनिक आहे. १६ मार्च रोजी क्लिनिकमधील रिव्हॉल्व्हर, कॅमेरा आणि २० हजार रुपयांची रोकड चोरल्याचे लक्षात आले. त्यांनी व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस तपासात सीसीटीव्ही चित्रीकरणात डॉ. गुप्ता यांच्याकडे आधी काम करणारा नोकर क्लिनिकमध्ये आल्याचे दिसत होते. त्याचे नाव रामप्रीत वर्मा असल्याचे डॉ. गुप्ता यांनी पोलिसांना सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध सुरू झाला. वर्मा पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक पुण्याला रवाना झाले. ताब्यात घेतल्यावर वर्माने क्लिनिकमध्ये काम करणे सोडल्यानंतर चाव्या जवळ राहिल्याचे सांगितले. चाव्यांच्या मदतीने चोरी करण्याचे त्याने ठरविले.