मुंबई विद्यापीठ दीक्षान्त समारंभात सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यांचे प्रतिपादन

विज्ञान आणि मानवतावादाची सांगड घालून काम करणे हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

वैज्ञानिक नेहमी विज्ञानातील सत्य सांगत असतात. पण विज्ञानाने मानवतावादासाठी काम करणे ही काळाची गरज आहे. जगातील १४१ नोबेल पारितोषिक विजेते याकरिता एकत्र आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लिबियातील तुरुंगांमधील  बल्गेरियन परिचारिकांच्या मुक्ततेबरोबरच अनेक आव्हानात्मक मानवतावादी कार्ये  वैज्ञानिकांनी पार पाडली आहेत. ‘‘रसायन शास्त्रामध्ये बीएस्सी केल्यानंतर मी ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये पीएचडी पूर्ण केली. पुढे विज्ञान जगतातील रासायनिक कोडी सोडविण्याचा ध्यास लागला आणि तोच टिकला.’’असेही रॉबर्टस यांनी सांगितले.

‘अ लाइफ इन सायन्स शेप्ड बाय लक’ या विषयावर त्यांनी प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती आणि राज्यपाल चे विद्यासागर राव होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले की, दर्जेदार शिक्षण, सृजनशीलता, संशोधन आणि नाविण्यपूर्णता यांचा ध्यास घेऊन राष्ट्र उभारणीसाठी विद्यापीठ कटीबद्ध आहे.

यावेळी पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९३,५८९ स्नातकांना पदव्या देण्यात आल्या. यात १ लाख ४ हजार ५९४ विद्यार्थिनी तर ८८ हजार ९९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात पदवीसाठी १,६०,२१८ तर पदव्युत्तर ३३,३७१ विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या. शाखानिहाय आकडेवारी पाहता मानव्यविज्ञान शाखेतील २४ हजार २८२, आंतरविद्याशाखेतील ७ हजार ६०३, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील १ लाख ६ हजार ७२४ तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील ५४ हजार ९८० पदव्यांचा समावेश आहे. तर विविध विद्याशाखेतील ३३२ स्नातकांना एमफील-पीएचडी पदवी देण्यात आली आहे.

मुलींची बाजी

विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या ४० विद्यार्थ्यांना ५२ पदके बहाल करण्यात आली आहेत. ज्यामध्ये ५१ सुवर्ण आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. सुवर्ण पदकांची कमाई करण्यात मुली आघाडीवर आहेत. यंदा ३३ विद्यार्थिनींनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र हे प्रमाण घसरले आहे. सहा विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन-दोन पदके मिळवली आहेत तर विधी या शाखेतील भूमी दफ्तरी आणि पाश्र्व बानखरिया या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी चार-चार पदके मिळवली आहेत.