वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मुंडकं छाटण्याची धमकी देणाऱ्या रिक्षाचालकाला खार पोलिसांनी अटक केली आहे. अनेक तास पाठलाग केल्यानंतर पोलिसांना रिक्षाचालकाला अटक करण्यात यश आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने रविवारी संध्याकाळी आरोपी रिक्षाचालक दिपक शर्माला नो-एंट्री झोनमध्ये प्रवेश केल्याने अडवलं होतं.

‘वाहतूक पोलीस कर्मचारी चालान लगावत असताना याआधीचे अनेक दंड रिक्षाचालकाने भरले नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या दंडाची एकूण रक्कम पाच हजार रुपये होती. पोलीस कर्मचाऱ्याने दिपक शर्माला सगळा दंड भरायला लावला’, अशी माहिती वांद्रे वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

सर्व दंड भरल्यानंतर दिपक शर्मा याचा संताप झाला आणि त्याने पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पण यानंतर तो तेथून निघून गेला होता. ‘काही वेळाने तो परत आला आणि वाहूतक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर कागद टाकत हिंमत असेल तर तुमची हत्या करण्यापासून मला रोखून दाखवा असं आवाहन दिलं’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. यानंतर कर्मचाऱ्याने खार पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिपक शर्माविरोधात गुन्हा दाखल केला.

‘दिपक शर्माची पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि शोध घेण्यास सुरुवात केली’, असं अधिकाऱ्याने सांगितलं. पोलिसांना दिपक शर्मा कार्टर रोडला असल्याची माहिती मिळाली, पण ते पोहोचेपर्यंत त्याने पळ काढला होता. यानंतर पोलिसांनी नॅशनल कॉलेजजवळ त्याला ट्रॅक केलं. पण तेथूनही त्याने पळ काढला. अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास खारदांडा येथे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याची अधिक माहिती मिळवत आहेत.