19 September 2019

News Flash

डोंबिवलीत भरदिवसा रिक्षाचालकाकडून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न

डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या मनिषा राणे त्यांच्या मैत्रिणीसह स्टार कॉलनीतून स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईत दोन तरुणांनी महिलेचा पाठलाग केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीत एका रिक्षाचालकाने भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दोन सतर्क तरुणांमुळे रिक्षाचालकाचा हा प्रयत्न फसला असून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या मनिषा राणे शुक्रवारी सकाळी त्यांच्या मैत्रिणीसह स्टार कॉलनीतून स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या. त्यांनी रिक्षाचालक शंकर विसलावथ याला थांबवले. पण विसलावथने त्यांना नकार दिला आणि तिथून रिक्षा घेऊन निघून गेला. पुढे चालत जात असताना मनिषा राणे यांना प्रवाशांची वाट पाहत थांबलेला विसलावथ दिसला. जवळचे भाडे नाकारुन लांबचे भाडे घेण्यासाठी तो थांबला होता. हा प्रकार बघून मनिषा राणे संतापल्या. त्यांनी विसलावथला जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर विसलावथने मनिषा राणे यांच्या मैत्रिणीला रिक्षेत खेचले आणि रिक्षा सुरु करुन पळ काढला. यादरम्यान, दोन तरुण तिथून दुचाकीने जात होते. मनिषा राणे यांनी त्या तरुणांकडे मदत मागितली. धाडसी तरुणांनी रिक्षेचा पाठलाग केला आणि विसलावथला अडवले. यानंतर विसलावथला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विसलावथविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on August 18, 2017 6:20 pm

Web Title: rickshaw driver held for attempt to kidnap women in dombivli