रिक्षात बसलेल्या परदेशी नागरिकाकडे भाडे म्हणून डॉलर्सची मागणी करत त्याला नकार दिल्याने थेट त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना विक्रोळीत उघडकीस आली आहे. रिक्षाचालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी या नागरिकाने थेट धावत्या रिक्षामधून उडी मारली. २४ एप्रिलच्या सायंकाळी घडलेल्या घटनेसंदर्भात विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून काही संशयितांची चौकशी केली आहे.
जपानच्या चिबा शहरात राहणारे अकिरा शिगेता (४५) कांजूरमार्गमधील एका अभियांत्रिकी संस्थेत काम करत आहेत. रविवारी सायंकाळी ते घाटकोपरच्या आर-सिटी मॉलमध्ये अकिरा गेले होते. तिथून हिरानंदानी पवई येथील निवासस्थानी जाण्यासाठी त्यांनी रिक्षा बोलावली. रिक्षातून जात असताना अकिरा यांनी रिक्षाचे मीटर चालू नसल्याचे पाहिले. त्यांनी तोडक्यामोडक्या इंग्रजीत त्याचे कारण रिक्षाचालकाला विचारले. पण, रिक्षाचालकाने त्याला उध्दटपणे उत्तर दिले. अकिराने रिक्षातून उतरण्याची इच्छा प्रकट केली असता, रिक्षाचालकाने रिक्षाचा वेग वाढवला आणि रिक्षा विक्रोळीच्या दिशेने नेली. १५ डॉलर दिले तरच गाडी थांबवेन असे रिक्षाचालक म्हणून लागला, त्यावेळी माझ्याकडे रुपये आहेत मग मी डॉलर का देऊ, असा प्रतिवाद केला असता, रिक्षाचालकाने आता ५० डॉलर्स द्या, असा तगादा लावला. रिक्षा पवईच्या दिशेने न जाता विक्रोळीच्या दिशेने निर्जनस्थळी जात असल्याचे पाहून रिक्षाचालक पैशांसाठी आपल्या जीवाचे बरे-वाईट करायला कमी करणार नाही, अशी भीती जाणवल्याने अकिरा यांनी बाहेर उडी मारली.