बेस्ट संपांचे दोन दिवस रिक्षा चालक आपल्या स्वभावगत मुजोरीला जागले आणि आधीच त्रस्त असलेले मुंबईकर आणखीनच हैराण झाले. उपनगरांमध्ये रिक्षाचालक मीटरने भाडी नेण्यापेक्षा मनमानी आकडे सांगत होते. तर नेहमीच्या शेअर रिक्षासाठीचे भाडे दुपटीने घेतले जात होते. नेहमीप्रमाणेच पोलीस वा आरटीओ या यंत्रणा डोळ्यांवर कातडे ओढून बसल्या होत्या. त्यामुळे रिक्षा/ टॅक्सीवाल्यांना लुटीचा जणू अधिकृत परवानाच मिळाला होता. १०-१२ रुपये माणशी भाडे असलेल्या अंतरासाठी रिक्षा चालक बिनधास्तपणे माणशी २०-२५ रुपये आकारत होते. तर वांद्रे ते कुर्ला या अंतरासाठी नेहमी मीटरप्रमाणे ३५-४० रुपये होतात. याच अंतरासाठी रिक्षाचालक मीटर न टाकता ७० रुपये एवढा दर सांगत होते.