इम्रान खान एक कोंडीमध्ये सापडलेला माणूस आहे अशी प्रतिक्रिया निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या युद्धाच्या इशाऱ्यावर बोलताना भूषण गोखले म्हणाले की, इम्रान खान एक कोंडीमध्ये सापडलेला माणूस आहे. मुंबई, पुलवामा हल्ल्याचे मास्टर माईंड पाकिस्तानात खुले फिरत आहेत. पाकिस्तानात लष्करी केंद्रांजवळच दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ आहेत. त्यावर त्यांना कारवाई करता आलेली नाही असे गोखले म्हणाले. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

दहशतवादाविरोधात पाकिस्तानला आतापर्यंत खूप पुरावे दिले. पण त्यांना ते पुरावे मान्य नाहीत. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर दहशतवाद्यांनीच हल्ल्याचा प्रयत्न केला असे गोखले यांनी सांगितले. पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई केली तर पाकिस्तानी जनतेला आर्थिक समृद्धी मिळेल. त्यांचे भले होईल असे गोखले म्हणाले. पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरण्याची गरज नाही. योग्यवेळी कारवाई होईल असे त्यांनी सांगितले.

काय म्हणतात इम्रान खान
हा नवा पाकिस्तान आहे. नवी विचारसरणी आहे असं यावेळी इम्रान खान यांनी सांगितलं. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही तयार असून जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत अशी मागणी करत आम्ही कारवाई करु असं आश्वासन इम्रान खान यांनी दिलं. यावेळी त्यांनी भारताशी कधीही चर्चा करायचं म्हटलं की आधी दहशतवादावर चर्चा करण्याची मागणी केली जाते. आम्ही दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत असं इम्रान खान यांनी यावेळी सांगितलं.