२५ टक्के राखीव कोटय़ात शिल्लक राहिलेल्या जागांवर यंदा प्रथमच जूनमध्ये प्रवेश

शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल आणि वंचित वर्गातील विद्यार्थ्यांकरिता राखीव असलेल्या २५ टक्के कोटय़ातील रिक्त जागांच्या प्वेशासाठी मुंबईमध्ये लवकरच दुसरी ऑनलाइन फेरी राबविण्यात येणार आहे. पहिल्या फेरीमध्ये मुंबईतील शाळांमधील केवळ ३३ टक्के जागा भरल्या होत्या. दुसरीकडे अजूनही सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करूनही प्रवेश न मिळाल्यामुळे ते वंचित आहेत. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीचा लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत ही फेरी जानेवारी महिन्याच्या सुमारास घेतली जात होती. परंतु, त्याला पालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा प्रथमच ही प्रवेश फेरी जूनमध्ये पार पडत आहे.

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षांकरिता मुंबईमधील ३३४ शाळांनी २५ टक्के राखीव जागा भरण्यासाठी नोंद केली होती. या शाळांमधील ८५९३ जागांसाठी ९४२६ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी फक्त २८७२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून इतर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी पुन्हा एकदा प्रवेश फेरी राबविण्यात येणार असल्याचे असे शालेय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले. २०१४ पासून राबविण्यात येणाऱ्या   सदोष ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये दरवर्षीच शाळांमधील जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त राहत आल्या आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी कधीच दुसरी फेरी राबविली गेली नाही.

दुसरीकडे रिक्त जागांवर इतर वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असा शासन निर्णय राज्य शासनाने या वर्षी जाहीर केला.

त्यामुळे २५ टक्के जागा रिक्त ठेवण्यापेक्षा दुसरी फेरी राबवून त्या जागा भरण्याची मुभा पालिकेला देण्यात आली आहे. म्हणून या वर्षी मुंबई विभागाकरिता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे.

मुंबईतील ३३४ शाळांमधील ५७२१ जागांसाठी ही दुसरी प्रवेश फेरी या आठवडय़ापासून सुरू करण्यात येणार आहे. याआधी प्रवेश अर्ज केलेल्या पालकांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

पहिल्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करू न शकलेले पालक नव्या फेरीकरिता अर्ज करू शकतात. आधीचे आणि नव्याने आलेले प्रवेशअर्ज यांची मिळून सोडत काढण्यात येईल.

त्यामधून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश दिले जातील. शासनाने जाहीर केलेल्या नव्या निणर्यानुसार ३० सप्टेंबर रोजी ५ वर्षे ४ महिने पूर्ण होत असलेल्या बालकांनाच पहिलीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.

chart

दुर्बल गटातील बालकांना २५ टक्के राखीव जागेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाकडून वृत्तपत्रामध्ये जाहिरात देण्यात येते. काही शाळांसाठी खूप अर्ज येतात, तर काही शाळांसाठी अर्जच येत नाहीत.

त्यामुळे अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी जागाही मोठय़ा संख्येने रिक्त राहतात. या वर्षी ३९ शाळांमधील ७६४ जागांसाठी अर्जच आलेले नाहीत, असा खुलासा अधिकाऱ्यांकडून या वेळी बोलताना करण्यात आला आहे.

शासनाचा खुलासा एक वेळ मान्य केला तरी ७८२९ जागांसाठी तरी अर्ज आले होते. तरीसुद्धा फक्त २८७२ विद्यार्थ्यांनाच प्रवेश कसा मिळाला? ऑनलाइन पद्धतीतील अनेक तांत्रिक चुका असल्यामुळे ५ वेळा पुनर्फेरी होऊनही विद्यार्थ्यांना एकाही शाळेत प्रवेशपत्र मिळालेले नाही. तेव्हा ऑनलाइनसाठी वापरात येणाऱ्या तंत्रज्ञानाची फेरतपासणी शासनाने करणे गरजेचे आहे.

सुधीर परांजपे, कार्यकर्ते, अनुदानित शिक्षा बचाव समिती