राज्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून आता वर्षांला किमान ९९० ते एक हजार ७५० रुपये शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येईल.

शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्याचा माध्यमिक शिक्षण विभागाने तीन वर्षांपूर्वी पाठवलेल्या प्रस्तावावर आता बालभारतीचा निधी वापरून शिक्षण विभागाने तोडगा काढला आहे. पाचवी आणि आठवीच्या स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. राज्यातील जवळपास सात ते आठ लाख विद्यर्थी ही परीक्षा देतात. त्यापैकी पाचवी आणि आठवीच्या मिळून सुमारे ३३ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. पाचवीच्या विद्यार्थ्यांना सहावी, सातवी, आठवी अशी तीन वर्षांसाठी, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना नववी आणि दहावी या दोन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय ग्रामीण, राष्ट्रीय सर्वसाधारण, ग्रामीण सर्वसाधारण, शहरी सर्वसाधारण, ग्रामीण अनुसूचित जाती, भूमिहीन शेतमजुरांचे पाल्य, ग्रामीण आदिवासी असे विविध संच आहेत. तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना पाचवीसाठी वर्षांतील दहा महिन्यांसाठी एकूण २५० ते १००० रुपये, तर आठवीसाठी ३०० रुपये ते एक हजार ५०० रुपये इतकी शिष्यवृत्ती सध्या देण्यात येते. शिष्यवृत्तीची रक्कम वाढवून मिळावी अशी मागणी सातत्याने होत होती. शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क आणि खर्चही मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपेक्षा अधिक आहे. मात्र, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा देत शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बालभारतीचा निधी वापरण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला वर्षांला ७५० रुपये बालभारतीकडून देण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता वर्षांला किमान ९९० रुपये ते एक हजार ७५० रुपये शिष्यवृत्ती मिळू शकेल. बालभारतीच्या नियामक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यातील अपंग विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारीत विषयांचे अध्ययन सहज आणि सोपे व्हावे यासाठी ऑडीओ बुक बालभारतीच्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.