अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात बुधवारी ‘आप’चे नेते आशिष खेतान यांनी ट्विटरवरून खळबळजनक खुलासा केला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये सनातन संस्था आणि हिंदू जनजागृतीचा सहभाग असल्याचे धागेदोरे चौकशी यंत्रणांना सापडल्याचा दावा खेतान यांनी केला आहे. दाभोलकर प्रकरणाचा तपास आता पूर्ण झाला असून, त्यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्तेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे मी दोन वर्षांपूर्वीच सांगितले होते, असे खेतान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय, सनातनने गोवा आणि महाराष्ट्रात अनेक बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोपही खेतान यांनी केला आहे. या घटनांनंतर सुरक्षा यंत्रणांना सनातनवर बंदी टाकायची होती. मात्र, काँग्रेस सरकारमुळे तसे होऊ शकले नाही. मात्र, आता डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत सनातन आणि हिंदू जनजागृती समितीचा सहभाग असल्याचे धागे पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा आशिष खेतान यांनी केला आहे.