* १ मे पासून अंमलबजावणीची मागणी
* मुंबई ग्राहक पंचायतीचा भाडेवाढीला विरोध
रिक्षा-टॅक्सींच्या भाडे सुसूत्रीकरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. पी. एम. ए. हकीम यांच्या एकसदस्यीय समितीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय न्यायालयाने घेतलेला नसतानाच पुन्हा एकदा १ मेपासून भाडेवाढ लागू करण्याची मागणी रिक्षा-टॅक्सीचालकांकडून करण्यात येत आहे. या प्रस्तावित भाडेवाढीस मुंबई ग्राहक पंचायतने विरोध केला असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. हकीम समितीने दरवर्षी १ मे रोजी भाडेवाढ करण्याची शिफारस केली होती. त्या शिफारशीनुसार यंदाही १ मे रोजी रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ लागू करण्याची मागणी युनियनने केली आहे.  
राज्य शासनाने नियुक्त केलेल्या एकसदस्यीय समितीस मुंबई ग्राहक पंचायतने न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. या याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र ११ ऑक्टोबर रोजी रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली. आता पुन्हा हकीम यांच्या शिफारशींचा आधार घेत १ मेपासून भाडेवाढ करण्याची मागणी युनियनच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून ही भाडेवाढ करण्यात येऊ नये, यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
ही भाडेवाढ झाली तर अवघ्या १९ महिन्यांमध्ये रिक्षांसाठी चौथी तर टॅक्सींसाठी १५ महिन्यांतील तिसरी भाडेवाढ असेल, असे देशपांडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. गुरुवारी ग्राहक पंचायतच्या याचिकेवर सुनावणी होणे अपेक्षित होते मात्र ही सुनावणी झाली नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत भाडेवाढ करू नये, अशी विनंतीही ग्राहक पंचायतने मुख्यमंत्र्यांना केली आहे.