कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पुन्हा करोना संसर्गामुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तरीही अनेक नागरिक मुखपट्टी न घालता रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. बाजारांमध्ये लोक गर्दी करत आहेत. शासनाने केलेल्या नियमांचाही फज्जा उडू लागला आहे. असाच बेशिस्तपणा कायम राहिला तर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पुन्हा शासन आदेशाप्रमाणे कठोर निर्णय लागू केले जातील, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज एकूण ३९२ रूग्ण आढळून आले त्यामुळे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या २३६० झाली आहे. आजच्या दिवसात बरे होवून घरी परतणाऱ्या रूग्णांची संख्या १६९ होती त्यामुळे एकूण डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या ६१८९६ इतकी झाली आहे. महापालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

आज आढळलेल्या रूग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे

कल्याण पूर्व – ६७
डोंबिवली पूर्व – १२९
मांडा टिटवाळा – १२
कल्याण पश्चिम – १२८
डोंबिवली पश्चिम – ५२
मोहना – ०४

लसीकरणाची सुविधा

कल्याण-डोंबिवली पालिकेची दोन रुग्णालय, दोन करोना काळजी केंद्रांमध्ये रहिवाशांना विनाशूल्क करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुविधा देण्यात आली आहे. डोंबिवली, कल्याणमधील चार खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे पालिका हद्दीत एकूण आठ ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाली आहेत.