गेल्या दोन आठवडय़ांत करोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच गेल्या २४ तासात ९,८५५ एवढे नवे रुग्ण आढळल्याने सरकारी यंत्रणेची चिंता पुन्हा वाढली आहे.

गेल्या आठवडय़ात नऊ हजारांच्या आसपास रुग्ण आढळले होते. चार महिन्यांनंतर प्रथमच दिवसभरात १० हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढली असली तरी मृतांची संख्या कमी आहे.

दिवसभरात ठाणे २४१, कल्याण-डोंबिवली २४६, नवी मुंबई १५९ , नाशिक ५९३, जळगाव ४३५, पुणे शहर ८५७, पिंपरी-चिंचवड ४६१, उर्वरित पुणे जिल्हा ३७८, सातारा १२९, औरंगाबाद ४४९, अकोला २३४, अमरावती ४८३, नागपूर ९२४ नवे रुग्ण आढळले. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ८२,३४३ एवढी झाली आहे. राज्यात २४ हजार १८६ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण

राज्यात ६० वर्षांवरील २४ हजार १८६ ज्येष्ठ नागरिकांचे बुधवारी लसीकरण झाले असून मुंबईत सर्वाधिक सुमारे ९ हजार ज्येष्ठांनी लस घेतली. राज्यात बुधवारी ५१ हजार २४० लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यात ५० हजार २६३ लाभार्थ्यांनी कोव्हिशिल्ड तर ९७७ जणांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली. ४५ वर्षांवरील ३६५६ जणांना राज्यभरात बुधवारी लस दिली गेली, तर मुंबईत १०७८ जणांनी घेतली. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातील करोना आरोग्य केंद्रात सर्वाधिक ३००० लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असून यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल सेव्हन हिल्समध्ये २५०० जणांचे लसीकरण झाले. मुंबईत बुधवारी एकूण १८ हजार ५५६ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले.

११२१ नवे रुग्ण मृत्यू

मुंबईत बुधवारी करोनाचे ११२१ नवे रुग्ण आढळले तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या दहा हजाराच्यापुढे गेली आहे. एका दिवसांत मुंबईत ७३४ रुग्ण करोनामुक्त झाले. मुंबईतील चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाण चार टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर गेले आहे.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३,२८,७४० झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या ११,४८२ वर गेली आहे. एका दिवसात ७३४ रुग्ण बरे झाले असल्याने आतापर्यंत ३,०६,३७३ म्हणजेच ९३ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली असून सध्या १०,०१० रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत ३३ लाख ३१ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर आणखी वाढून ०.२९ टक्के  झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही २३५ दिवसांपर्यंत खाली गेला आहे.