|| प्रसाद रावकर

वर्षभरात वाहनांच्या संख्येत अडीच लाखांची भर; वाहतूककोंडी, प्रदूषण, वाहनतळांचे प्रश्न ऐरणीवर

मुंबई : दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, वाहतूककोंडीचा जटिल झालेला प्रश्न आणि अपुऱ्या वाहनतळांमुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केली जाणारी वाहने, यांमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या असतानाच वर्षभरात मुंबईतील वाहनसंख्येत तब्बल दोन लाख ५० हजार नव्या वाहनांची भर पडली आहे.

पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधून दररोज मोठ्या संख्येने नागरिक नोकरीच्या निमित्ताने दक्षिण मुंबई आणि आसपासच्या परिसरात येत असतात. अनेक जण स्वत:च्या खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यातच ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या शहरांतील नागरिकही कामानिमित्त आपल्या वाहनाने मुंबईत येत-जात असतात. परिणामी कार्यालयीन वेळेत होणाऱ्या वाहतूक कोंडीत तासन्तास अडकून पडावे लागते. प्रदूषणाचा त्रास वाढतो तो वेगळा. त्यामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता वाढते.

वाहतुकीमुळे निरनिराळ्या समस्या निर्माण होत असताना गेल्या तीन वर्षांत मुंबईतील वाहन संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल २०१७ ते मार्च २०२० या काळात मुंबईमधील वाहनांच्या संख्येत पाच लाख ३५ हजार ०८२ वाहनांची भर पडली आहे. यांपैकी दोन लाख ५० हजार ५१७ वाहने एप्रिल २०१९ ते मार्च २०२० काळात वाढली. सध्या मुंबईमधील एकूण वाहनांची संख्या ३८ लाख ८७ हजार ७२२ वर पोहोचली असून त्यात दुचाकी वाहनांचे प्रमाण ५९.०९ टक्के, तर चारचाकी वाहनांचे प्रमाण २९.०५ टक्के आहे.

‘जुन्या वाहनांबाबत निर्णय घ्या’

मुंबईमधील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचे जाळे उभे करण्यात येत आहे. त्याचबरोबर मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचेही काम सुरू आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांचा भार वाढतच आहे. त्यासोबत वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल होत आहे. तोडगा म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्याचबरोबर १५ वर्षे जुन्या वाहनांबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे, असे वाहतूकतज्ज्ञांचे मत आहे.