मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीचे प्रतिकूल परिणाम मुंबई, ठाण्याच्या बाजारपेठेत नव्याने जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांदा-बटाटय़ाच्या दरांत अचानक वाढ झाली आहे. वाशी येथील घाऊक बाजारात (एपीएमसी) अतिशय सुमार दर्जाच्या कांद्याची आवक सुरू असून उत्तम प्रतीचा कांदा २२ रुपये किलोने विकला जाऊ लागला आहे. किरकोळ बाजारात कांदा २८ ते ३० तर बटाटा २५ रुपये किलोच्या घरात पोहचल्याने यंदा पावसात भिजून भज्यांचा आस्वाद घेणे खिशाला भार ठरणार आहे.
दोन दिवसांपासून वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचा सूर उमटू लागला असून पुढील महिनाभर तरी हीच स्थिती कायम राहील, असा दावा एपीएमसीतील व्यापारी करू लागले आहेत. मुंबई परिसरातील कांद्याचे दर आटोक्यात राहण्यासाठी दररोज किमान १०० गाडी कांद्याची आवक आवश्यक असते. यापैकी ६० गाडी कांदा हॉटेल व्यावसायिकांना लागतो. तसेच येणाऱ्या गाडय़ांपैकी ७०पेक्षा अधिक गाडय़ांमधून येणारा कांदा सुमार दर्जाचा आहे, अशी माहिती एपीएमसीचे संचालक अशोक वाळुंज यांनी दिली. दरम्यान, घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा २२ रुपये तर सुमार कांदा १० रुपयांनी विकला जात आहे, अशी माहिती कांदा-बटाटा आडत संघाचे पदाधिकारी चंद्रकात रामाणे यांनी दिली. गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्याचे परिणाम आता जाणवत आहेत, असेही त्यांनी सांगितले.