तीन दिवसांचा कालावधी देण्याची मार्डची मागणी

मुंबई : करोना विभागात काम केलेल्या निवासी डॉक्टरांना के वळ एक दिवस विलगीकरणात राहून सेवेत रुजू होण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. पालिकेच्या नव्या धोरणामुळे मात्र रुग्णांसह डॉक्टरांमध्येही संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढणार असल्याने मार्डने याला विरोध दर्शविला आहे.

संसर्ग प्रसाराचा धोका टाळण्यासाठी निवासी डॉक्टरांसह परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सात दिवस करोना विभाग, सात दिवस सुट्टी आणि नंतरचे सात दिवस करोनाव्यतिरिक्त विभागात असे २१ दिवसांचे चक्राकार पद्धतीने कामाचे नियोजन करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी हे शक्य नसल्याने अखेर पालिका रुग्णालयांमध्ये करोना विभागात दहा दिवस काम केल्यावर पाच दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी निवासी डॉक्टरांना दिला जात होता. परंतु आता टाळेबंदी शिथिल केल्यावर  नव्या परिपत्रकानुसार, करोना विभागात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना एक दिवसाची रजा घेऊन लगेचच दुसऱ्या दिवशी कामावर रुजू व्हावे लागणार आहे.

आमच्यातील एकतृतीयांश निवासी डॉक्टर करोना विभागात कार्यरत असतात.  या नव्या नियमानुसार जर हे डॉक्टर लगेचच रुजू झाले तर बिगर करोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये संसर्ग प्रसार होण्याचा अधिक धोका आहे. शिवाय  उपाहारगृहे, वसतिगृहांतही याचा वावर वाढल्यास इतर डॉक्टरांनाही लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उलट मनुष्यबळ अधिक कमी होईल, असे मार्ड प्रतिनिधींनी व्यक्त केले.

पालिकेच्या नायर, लो.टिळक, केईएम या प्रमुख रुग्णालयांमध्ये आत्तापर्यंत जवळपास साडेचारशेहून अधिक निवासी डॉक्टरांना करोनाची बाधा झालेली आहे. त्यामुळे बाधा होण्याचा धोका असतो. आम्हाला लगेचच रुजू होण्यासाठी हरकत नाही. परंतु डॉक्टरांच्या कमतरतेसाठी इतर रुग्ण आणि डॉक्टरांचा जीव धोक्यात घालू नये. तेव्हा करोना विभागात काम केल्यावर किमान तीन दिवस विलगीकरणासाठी द्यावेत, अशी मागणी मार्डकडून केली जात आहे.